बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील घाणखेड येथील एका ६० वर्षीय शेतकऱ्याचा उष्मघाताने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १७ मे रोजी घडली. सुरेश पुंडलिक वराडे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
सुरेश वराडे दररोज शेती काम करण्यासाठी ते शेतात जात होते. दिनांक १५ मे रोजी देखील ते नेहमीप्रमाणे शेतात गेले व शेती काम आटोपून घरी आले तेव्हा त्यांना ऊन लागले होते. थकवा आल्याने त्यांनी घरी प्राथमिक उपचार केले. पण फरक पडला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दवाखान्यात जाऊन सलाईन लावून उपचार घेतले. मात्र. दिनांक १७ मे रोजी सकाळी पाच वाजता त्यांच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सुना नातवंडे व भाऊ वहिनी असा परिवार आहे. मनूर बु।। येथील अमजित पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक यु.पी. वराडे यांचे भाऊ होत. संध्याकाळी ५ वाजता दुःखद वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सध्या उन्हाचे तापमान प्रचंड प्रमाणात वाढले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी व इतर नागरिकांनी ऊन होण्याच्या अगोदर व संध्याकाळी कामे उरकावेत दुपारच्या वेळी कामासाठी बाहेर निघू नये उष्माघाताने मृत्यू झाल्याची बोदवड तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी व बाहेर निघताना रुमाल टोपी व जास्तीत जास्त पाणी प्यावे असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
गेल्या आठवडयापासून उष्णतेच्या लाटेने जळगाव जिल्हा भाजून निघत असून, जिल्ह्याचे तापमान हे 46 अंशावर पोहचले आहे. अगदी राज्यात तापमानाचा पारा उंचावला असताना जिल्ह्यात सर्वाधिक तापमान नोंदविले जात आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ५ ते ६ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.