ठाणे (वृत्तसंस्था) मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनआयएने सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना अटक केली आहे. या प्रकरणात एकूण ५-७ जणांचा समावेश असल्याची माहिती आहे. या प्रकरणात आणखी तीन अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. सचिन वाझे यांच्या शिवाय आणखी काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी होऊ शकते.
मुंबईत स्फोटकांनी भरलेल्या गाडी प्रकरणात संशयाची सुई असणारे मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना अखेर एनआयए (NIA) कडून अटक करण्यात आली आहे. शनिवारी तब्बल १३ तासांच्या चौकशीनंतर सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. मुंबईतील एका हाय प्रोफाइल परिसरात गाडीत स्फोटकं सापडलेल्या प्रकरणात वाझे यांची चौकशी करून त्यांना अटक केली गेली आहे. दरम्यान, स्फोटकांनी भरलेली गाडी प्रकरणाच्या कटात ५-७ जणांचा समावेश होता. सूत्रांनुसार, NIA ने याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात मुंबई पोलीस दलातील आणखी काही अधिकाऱ्यांची देखील चौकशी होऊ शकते. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये खळबळ उडाली आहे. एनआयएच्या तपासात आणखी एक माहिती समोर आली आहे ती म्हणजे ठाणे याठिकाणाहून आणखी 3 जणांच्या अटकेची शक्यता आहे. याप्रकरणी इनोव्हा गाडीतून जाणारे दोन्ही चालक आणि एका व्यावसायिकाला अटक होऊ शकते.
अखेर सापडली ती पांढरी गाडी
दरम्यान या पांढऱ्या इनोव्हा गाडीबाबत देखील एनआयएच्या तपासात मोठा उलगडा झाला आहे. NIA ने ही गाडी शोधून काढत ती NIA च्या मुंबई कार्यालयात आणली आहे. एनआयएचे हे मोठे यश मानले जात आहे. त्यामुळे गेले काही दिवस जे पांढऱ्या गाडीचे गूढ होते, ते संपुष्टात आले आहे. ही इनोव्हा ठाण्यातील एका व्यावसायिकाची असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सचिन वाझे यांनी स्फोटक बाळगळी असा आरोप NIA ने केला असून लवकरच पांढऱ्या रंगांच्या इनोव्हाचा लेखाजोखा एनआयए आज जाहीर करणार आहे. ही गाडी सापडल्याने मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.