नवी दिल्ली (वृत्तसंस्था) शिलाँग-गुवाहाटी राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला आहे. महामार्गावर कारला लागलेल्या भीषण आगीमध्ये एका माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाचा होरपळून मृत्यू झाला आहे. मेघालयचे माजी मुख्यमंत्री ई. के. मावलोंग यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फर्डिनँड बंशानलांग लिंगदोह असं संबंधित दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तीचं नाव असून ते मेघालयचे माजी मुख्यमंत्री ई. के. मावलोंग यांचे सुपूत्र आहेत. मेघालयमधील काँग्रेसचे विद्यमान आमदार जॉर्ज लिंगदोह हे त्यांचे भाऊ असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. मृत फर्डिनँड लिंगदोह यांच्या नातेवाईकांनी घटनेची पुष्टी केली आहे.
मृत फर्डिनँड बंशानलांग लिंगदोह हे इम्फाळमधील केंद्रीय कृषी विद्यापिठात एक प्राध्यापक म्हणून काम करत होते. दरम्यान काल शिलाँग-गुवाहाटी राष्ट्रीय महामार्गावर एका कारमध्ये त्यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला आहे. कारला नेमकी आग कशी लागली? याबाबत कोणतीही माहिती समोर आली नसून पोलिसांकडून आगीच्या नेमक्या कारणाचा शोध घेतला जात आहे. एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होईपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती.