पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील लासगाव येथे उभ्या ट्रकला चारचाकी कार धडक दिल्याने कार मधील एक जण जागीच ठार झाला तर अन्य तीन जण जखमी झाल्याची घटना दि. २८ रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. जखमींवर जखमींवर जळगांव येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील लासगाव गावा नजीक रस्त्याच्या कडेला जळगांवच्या दिशेने विरुध्द बाजुला अवजड ट्रक (क्रं. एम. एच. २६ एच ५२६५) हा चालकाने उभा केला होता. दरम्यान पहाटे तीन वाजेच्या सुमारास जळगांवहुन पाचोऱ्याच्या दिशेने येणाऱ्या क्रेटा (क्रं. एम. एच. ०४ एच. एफ. ८२८३) ही चारचाकी कारने उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात शेख इस्माईल शेख अक्रम (वय – ४०) रा. मालेगाव हे जागीच ठार झाले. तर त्यांचे सोबत असलेले शेख जाकीर शेख जहांगीर (वय – ३५) रा. फार्मसी कॉलेज जवळ, मालेगाव, शेख सुलतान शेख उस्मान (वय – ३८) रा. मालेगाव, शेख कलीम शेख इब्राहिम (वय – २८) रा. मालेगाव व चालक शेख खान अनवर खान (वय – ३७) रा. मालेगाव हे जखमी झाले आहेत. मयत शेख इस्माईल शेख अक्रम यांचेवर जळगांव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येवुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मयत शेख इस्माईल शेख अक्रम यांचेवर शोकाकुल वातावरणात मालेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.