बुलढाणा (वृत्तसंस्था) पंक्चर झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लक्झरी बसला मागून मालवाहू वाहनाने धडक मारल्याने बस पुढे सरकली व तिने समोरच्या वाहनाच्या चालकाला धडक मारली. त्यात चालक ठार झाला. तर मालवाहू वाहनाच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी एका गर्भवती महिलेला धडक मारून रस्त्याच्या कडेच्या खड्ड्यात कोसळली. त्यामुळे महिलेसह गाडीचा चालक, क्लिनर ठार झाले. हा विचित्र अपघात राष्ट्रीय महामार्गावर चैतन्य बायोटेक कंपनीजवळ शुक्रवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडला.
राष्ट्रीय महामार्गावर मलकापूरनजीक राष्ट्रीय महामार्गावर चैतन्य बायोटेक कंपनीजवळ बस पंक्चर झाल्याने रस्त्याच्याकडेला उभी होती, त्यापुढे दुसरी बस उभी होती. तिचा चालक राजूभाई ऊर्फ हरीश लालूभाई यादव (४५, रा. रामधरी, सिहोर, भावनगर, गुजरात) हा स्टेपनी देण्यासाठी जात असताना मुंबईकडून नागपूरकडे भरधाव निघालेल्या मिनी ट्रकने त्याला चिरडले. यात तो जागीच ठार झाला. पुढे जाऊन मिनी ट्रकने लक्झरी बसमधून खाली उतरलेल्या अंजली आकाश मोहिते-जाधव (२५, रा. मूर्तिजापूर) यांनाही चिरडले. त्या गंभीर जखमी होऊन खाली कोसळल्या.
मलकापूरनजीक घडलेल्या अपघातात गंभीर जखमी अंजली आकाश मोहिते जाधव ह्या गर्भवती होत्या. त्यांच्यावर आधी उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना बुलढाणा येथे हलविण्यात आले. त्यानंतर दोन तासांनी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मिनी ट्रकच्या चालक वाहकाचाही मृत्यू दोन जणांचा जीव घेणारा मिनी ट्रक राष्ट्रीय महामार्गावर पुढे जाऊन खोलवर भागात कोसळला. त्यात चालक किरण खंडू मंदावणे (४२), वाहक सीताराम आप्पा रामू बारेला (४५, दोघेही रा. अमरोळी, सिंदखेडा, जि. धुळे) हे जागीच ठार झाले.
















