नाशिक (वृत्तसंस्था) मद्यपान करत असताना किरकोळ कारणावरून बाचाबाची होऊन भांडण विकोपाला गेल्याने एकाने त्याच्याच मित्राच्या डोक्यात फरशीचा तुकडा घालून खून केल्याची धक्कादायक घटना कामटवाडे परिसरात घडली. आनंद इंगळे (वय ३२) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
आनंद इंगळे (रा. कामटवाडे) व संशयित आनंद आंबेकर (वय २८, रा. कामटवाडे) हे दोघे मित्र स्व. मीनाताई ठाकरे शाळेजवळ सोमवारी (दि. ५) सायंकाळच्या सुमारास त्रिमूर्ती चौकातील एका हॉटेलमध्ये मद्यपान करीत होते. यावेळी त्यांच्यात क्षुल्लक कारणातून वाद झाला. नंतर ते दोघेही कामटवाडे गावाजवळ आले. तेथे त्यांच्यात हाणामारी झाली. यावेळी संशयित आनंद याने मयत आनंद इंगळे याला जबर मारहाण करण्यास सुरुवात केली.
यावेळी मयत इंगळे याच्या डोक्यात संशयित आंबेकर याने दुभाजकांमध्ये पडलेल्या फरशीचे तुकडे घातले. त्यामुळे आनंद इंगळे हा गंभीर जखमी झाला. परिसरातील काही नागरिकांनी याबाबत तत्काळ अंबड पोलिसांना माहिती दिली, तसेच जखमी असलेल्या आनंद इंगळे यास उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना आनंद इंगळे याचा मृत्यू झाला. याप्रकरणी संशयित आनंद आंबेकरविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे.
















