कुरियर बॉयला चहातून गुंगीचे औषध देऊन बसमधून ६४ लाखांचे दागिने लांबविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश !

आग्रामधून दोघांना पकडले, दोघं फरार ; धुळे पोलिसांची कामगिरी !

धुळे (प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून नाशिक – धुळे प्रवासादरम्यान एका कुरियर बॉयला चहामध्ये गुंगीकारक औषध पाजून तब्बल ६४ लाख ८० हजार २५३ रुपयांचे सोने-चांदीचे दागिने लांबविणाऱ्या चौघांपैकी दोघांना आग्रा जिल्ह्यातील जाजू गावातून जेरबंद करण्यात आले. अन्य दोन जण अद्याप फरार आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलिस यांनी संयुक्तपणे केली. दरम्यान,या गुन्ह्याची उकल झाल्याबद्दल तपास पथकाला दहा हजाराचे रिवार्ड जाहीर केल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी यावेळी दिली.

नेमकं काय घडलं होतं !

मुंबई येथील काळबादेवी परिसरातील विष्णुसिंह शिखरवार यांचे जय बजरंग कुरिअर सेवा आहे. या कुरिअर च्या माध्यमातून वेगवेगळ्या गावातील सराफी काम करणाऱ्या दुकानांचे दागिने पोच करण्याचे काम केले जाते. याच अंतर्गत कुरिअरचा डिलिव्हरी बॉय गोविंद रघुनाथसिंह शिखरवार हा शहरातील व्यापाऱ्यांचे सोन्याचे दागिने घेवून १४ जून रोजी पहाटे साडेपाच वाजता नाशिक येथून धुळे बसमध्ये बसला होता. बसमध्ये बसल्यानंतर त्याला गुंगी आली. धुळ्याला आल्यावर बॅगमध्ये ओले नारळ आणि पाण्याची बाटली ठेऊन कोणीतरी दागिने लंपास केल्याचे त्याच्या लक्षात आले. याप्रकरणी विष्णूसिंह सिकरवार यांनी शहर पोलिसात तक्रार दिली होती.

READ ALSO

तांत्रीक माहितीच्या आधारे आरोपींचा शोध !
याबाबत तांत्रीक माहितीच्या आधारे व नाशिक, धुळे येथील सीसीटीव्ही फुटेजची तपासणीत काही नावे समोर आली. त्यांचा शोध घेण्यासाठी शहर पोलिसांचे पथक उत्तरप्रदेश, राजस्थानमध्ये गेले होते. त्यात आग्रा जिल्ह्यातील जाजू गावातून पुष्पेंद्रसिंग शिवसिंग तोमर राजपूत (वय ३२, रा. धोलपूर, राजस्थान) आणि राहुल राजेंद्रसिंग सिसोदिया (वय २५, रा. आग्रा, उत्तरप्रदेश) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी सोने चोरी केल्याची कबुली दिली. या गुन्ह्याची उकल झाल्यानंतर धुळे शहर पोलीस ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, यांनी या गुन्ह्याची सविस्तर माहिती दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे ,उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश रेड्डी यांच्यासह तपास पथक उपस्थित होते.

मुद्देमाला हस्तगत !
चोरुन नेलेल्या मालापैकी ७७० ग्रॅम सोन्याचे दागिने, २ किलो ४०० ग्रॅम चांदीचे दागिने असा एकुण ४९ लाख ३६ हजार ७१५ रुपयांचा ऐवज व गुन्ह्यात वापरलेली ८ लाख रुपये किमतीची बलीनो कंपनीची कार (युपी ८३/ एयु- ९३३०) असा एकुण ५७ लाख ३६ हजार ७१५ रुपये किमतीचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला. तसेच संशयित राहुल सिसोदिया यास धुळ्यातून ताब्यात घेतले. त्याने कुरीयर बॉय गोविंद सिकरवार यास चहामध्ये गुंगीकारक औषध पाजले होते. यामुळे तो बसमध्ये गाढ झोपला. त्यानंतर दागिन्यांचे पार्सल लांबविण्यात आल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे. या गुन्ह्यातील अन्य दोघा संशयितांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

यांनी केली गुन्ह्याची उकल !
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, तपास अधिकारी सपोनि चंद्रकांत पाटील, पोउनि / प्रकाश पाटील, हेकॉ विजय शिरसाट, योगेश चव्हाण, पोना कुंदन पटाईत, पंकज खैरमोडे, पोकॉ मनिष सोनगीरे, महेश मोरे यांनी केली. तपास पथकास सायबर विभागाचे सपोनी संजय पाटील, पोकॉ अमोल जाधव यांनी तांत्रिक माहिती उपलब्ध करुन दिली.

Related Posts

Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!