अजिंठा (वृत्तसंस्था) सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथे नुकतेच उघडकीस आलेल्या बनावट लग्न लावून पैसे उकळणाऱ्या टोळीचे पाळेमुळे अजिंठा परिसरातही पोहोचली आहेत. परिसरातील खुपटा येथील तरुणाशी असेच बनावट लग्न करून १ लाख ६० हजार रुपये व नवरीच्या अंगावर घातलेले सोन्या चांदीचे दागिने घेऊन टोळीच्या मदतीने नवरीने पोबारा ठोकल्याची घटना उघडकीस आली आहे.
सिल्लोड तालुक्यातील खुपटा येथील रामराव काळे या शेतकऱ्याला तीन मुले आहेत. मोठा मुलगा लग्नाच्या वयात आल्याने त्याच्यासाठी मुलीच्या शोधात असताना त्यांच्या एका ओळखीच्या इसमाने त्यांची भेट जळगाव जिल्हातील पहूर येथील सीताराम महिपत सोनवणे यांच्याशी घालून दिली होती. सीताराम सोनवणे यांनी आम्ही तुमच्या मुलाच्या लग्नासाठी मुलगी शोधून देतो म्हणत पैसे लागतील असे सांगितले. यावरून दि.१२ एप्रिल रोजी सीताराम सोनवणे व रंजना कैलास यालीस (रा. इंद्राकुंड पंचवटी नाशिक) हे दोघे खुपटा येथे जाऊन आम्ही तुमच्या मुलाच्या लग्नासाठी मुलगी शोधली असून त्यासाठी १ लाख ८० हजाराची मागणी केली असता तडजोडी अंती शेतकरी पित्याने १ लाख ६० हजार रुपये दोघांना दिले.
मंदिरात लागले लग्न…!
शेतकरी पित्याने आपल्या मुलाच्या लग्नासाठी १ लाख ६० हजार रुपये बनावट टोळीला देताच दुसऱ्या दिवशीच १३ एप्रिल रोजी खुपटा येथील भगवती आई मंदिरात सकाळी १० वाजेच्या सुमारास बनावट नवरी रेखा राजू मिरेकर (पत्ता माहीत नाही) हिच्यासोबत लग्न लाऊन दिले. दरम्यान नववधुने राजूर गणपती दर्शनाचा हट्ट केला.
लंघुशंकेचा बहाणा करून नववधूने काढला पळ !
नववधू रेखाने हट्ट केल्याने नवऱ्यानेही तो पूर्ण करण्याचे ठरवले. त्यानुसार ते दोघे मोटारसायकलने १८ एप्रिल रोजी राजूर गणपतीच्या दर्शनासाठी निघाले होते. मात्र वाटेत असलेल्या भोकरदन येथे लंघुशंकेचा बहाणा करून बनावट नवरी रेखाने एस. टी. स्टैंड कडे निघून अंगावर घातलेल्या सोन्याचांदीचे दागिने व मोबाईल घेऊन तेथून बेपत्ता झाली. नवरदेवाने तिचा परिसरात शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण ती कुठेच आढळली नाही.
असे फुटले बिंग… !
अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल फर्दापूर येथे नुकतेच बनावट लग्न लावून पैसे उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाल्याने या प्रकरणी फर्दापूर पोलिसांनी ७ आरोपींना अटक केल्याची माहिती शेतकरी पित्याला कळताच त्यांनी फर्दापूर पोलिस ठाणे गाठले असता त्यांनाही ठगणारे रंजना कैलास यालिस व सिताराम महिफत सोनवणे हे दोघे दिसून आल्याने त्यांनी तत्काळ अजिंठा पोलिस ठाणे गाठत तक्रार दिल्यावरून वरील तिघांविरुद्ध अजिंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार अरुण गाडेकर, दिलीप तडवी आदी करीत आहे.