करमाड (वृत्तसंस्था) रस्ता ओलांडणाऱ्या पाच वर्षीय चिमुकलीला भरधाव वाहनाने चिरडल्याची घटना करमाड-लाडसावंगी रस्त्यावरील भांबर्डा गावाजवळ गुरुवारी (दि. २१) दुपारी तीन वाजता घडली. कोमल सुनील भिसे (५, रा. भांबर्डा, ता. छत्रपती संभाजीनगर) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. दरम्यान, कोमलची आई तिला वाचविण्याच्या प्रयत्नात जखमी झाली.
अपघातानंतर हायवा चालक फरार झाला. अलका सुनील भिसे या आपल्या आजारी मुलगी कोमल हिला उपचारासाठी लाडसावंगी येथे घेऊन गेल्या होत्या. तिला खासगी रुग्णालयात दाखवून त्या भांबर्डा फाट्यावर उतरल्या. दरम्यान, कोमल ही रस्ता ओलांडून गावाकडे जात असताना मुरुमाची वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकने (एमएच २० इएल ९३२७) तिला जोराची धडक दिली.
दोन्ही पायावरून हायवाचे चाक गेल्याने पायाचा चेंदामेंदा होऊन कोमल गंभीर जखमी झाली. ही दुर्घटना गावाच्या फाट्यावर घडल्याने ग्रामस्थांनी जखमी चिमुकलीला खासगी वाहनातून छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तर तिला वाचविताना आईही जखमी झाली. अपघातानंतर चालक वाहन सोडून घटनास्थळाहून पसार झाला.