जळगाव (प्रतिनिधी) टँकरच्या धडकेत एक पाय गमावलेल्या मुलीला ३२ लाख ६१ हजार रूपये नुकसान भरपाई देण्याचा निकाल नुकताच न्यायालयाने दिला आहे.
आयोध्या नगर येथील मानसी हेमंत पाटील ही १७ वर्षीय मुलगी शिक्षणासाठी शाळेत सायकलने जात असतांना दि. १६ नोव्हेंबर २०१४ रोजी खेडी गावाच्या बाहेर जानकी हॉटेलजवळ, हायवेवरून जात असतांना तिला टँकर क्र. (एम. एच. ४३ यु. २१२४) धडक दिल्यामुळे मानसीच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. अपघात होताच तिला समर्थ हॉस्पिटल व डॉ. अर्जुन भंगाळे यांच्याकडे उपचारासाठी दाखल केले होते. पायाला अतिशय गंभीर दुखापत असल्यामुळे डॉक्टरांनी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये तिचा उजवा पाय गुडघ्याच्यावरून कापला होता व तिच्यावर तज्ञ डॉक्टरांच्या सहाय्याने औषधोपचार केले.
मानसीला दवाखान्यातून सुट्टी मिळाल्यानंतर अॅड. महेंद्र सोमा चौधरी यांच्या मार्फत निष्काळजीपणे टँकर क्रमांक (एम.एच.४३ यु. २१२४) चालविणारा चालक मोहम्मद तजुर अली नाजुर मोहम्मद (रा. वडाळा, मुंबई) तसेच सदर टँकर हे रिलायन्स जनरल इंश्युरन्स कंपनीकडे विमाकृत होते. या सर्वावर अपघातामुळे झालेल्या नुकसान भरपाईची मागणी केली होती. याप्रकरणात न्या. बी. एस. वावरे यांनी सदर मुलीला विमा कंपनीने ३२ लाख ६१ हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी, असा निकाला दिला. अर्जदारातर्फे अॅड. महेंद्र चौधरी, अॅड. श्रेयस चौधरी, अॅड. हेमंत जाधव यांनी काम पाहिले.