जळगाव (प्रतिनिधी) जळगाव एलसीबीचे तत्कालीन निलंबीत पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाविरोधात केलेय आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी त्यांना तात्काळ अटक करून बडतर्फ करण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मराठा समाज बांधवांनी भव्य मोर्चा काढला. या प्रकरणातील अन्य संशयित सहायक फौजदार अशोक महाजन यांच्यावरही अटकेची कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मराठा बांधवांच्या मोर्चाला सुरूवात करण्यात आली होती. त्यानंतर स्वातंत्र्य चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सभा घेत त्याची सांगता करण्यात आली. यावेळी मराठा आत्मसन्मान अभियानाने दिलेल्या निवेदनात म्हटले की, बकाले आणि अशोक महाजन यांच्या संवादाची क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाली. त्यानंतर बकाले आणि महाजन यांना फक्त निलंबीत करण्यात आले आहे. तसेच जळगावच्या पोलीस अधिक्षकांनी बकाले आणि अशोक महाजन यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना संरक्षण देऊन नाशिकला जाण्यासाठी मदत करण्यात आल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला. न्यायालयाने जामीन फेटाळून पाच दिवस झालेले असतांनाही बकाले यांना अटक झालेली नाही. त्यामुळे त्यांना तात्काळ अटक करत कायमस्वरुपी सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. यावेळी छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे अशोक शिंदे, शिंदखेड राजा येथील जाधवराव घराण्याचे वंशज शिवाजी राजे जाधव, भास्कर काळे, गणेश पवार, संजीव भोर, किरण बोरसे, आनंद मराठे, संजय कापसे, महेश पाटील, उदय पाटील उपस्थित होते.