जळगाव (प्रतिनिधी) शहरातील बालगंधर्व खुले नाट्यगृहामध्ये मद्य प्राशन करुन मटन पार्टी करणाऱ्यांचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याबाबतची तक्रार महापालिके सह पोलीस प्रशासनाकडे प्राप्त होताच, त्यांनी तेथे छापा टाकला. पार्टी करणारे दोघे पोलिसांना सापडले तर चौघे तेथून पळून गेले. हा प्रकार रविवारी दुपारी सुमारास घडला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
शहरातील बालगंधर्व नाट्यृहात रविवारी दुपारच्या सुमारास काही तरुण मद्य आणि मासांहार शिजवीत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याबाबतची तक्रार महापालिका प्रशासनाला मिळताच शहर अभियंता योगेश बोरोले व बांधकाम अभियंता आर. टी. पाटील हे घटनास्थळी पोहचले. त्याचवेळी डायल ११२ क्रमांकावर तक्रार प्राप्त झाल्याने जिल्हापेठ पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बालगंधर्व सभागृहात जावून पाहणी करताच पार्टी करणाऱ्यांनी तेथून पळ काढला. यावेळी पळून जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौघे तेथून पसार झाले.
पार्टी करणारे दोघे ताब्यात तर चौघे गेले पळून
पार्टी करणाऱ्या दोघांना जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौघांचा शोध सुरु आहे. याप्रकरणी त्यांना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर बांधकाम विभागाचे शहर अभियंता यांनी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. मागील दरवाजातून आत शिरले मद्यपी बालगंधर्वच्या मागील बाजूस मोकाट गुरांना बांधण्याकरीता मनपाचा कोंडवाडा आहे. या बाजूने असलेला दरवाजा उघडा असल्यामुळे हे मद्यपी बालगंधर्व सभागृहात शिरले आणि तेथे पार्टी करीत असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांना घटनास्थळी पोलिसांना मद्याच्या रिकाम्या बाटल्या व मांस शिवजवतांना मिळून आले.
मनपा कर्मचारी नव्हे अनोळखी इसम
मनपा मालकीच्या असलेल्या बालगंधर्व खुले नाट्यगृहात मद्य पार्टी सुरु असल्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे मनपा अधिकारी खळबळून जागे झाले आणि त्यांना पार्टी करणारे हे मनपा कर्मचारी असल्याचा संशय आला. त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परंतू पार्टी करणारे मनपा कर्मचारी नसून ते अनोळखी इसम असल्याची माहिती शहर अभियंता योगेश बोरोले यांनी दिली.
















