धरणगाव (प्रतिनिधी) येथील गुणवत्तेची एकशे आठ वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेल्या शतकोत्तर पी.आर.हायस्कूलमध्ये आज ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांची मिरवणूक काढून शिक्षण प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.
दोन वर्षानंतर प्रथमच जून महिन्यात शाळा सुरू होणार म्हणून शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी रंगीबेरंगी रांगोळ्या काढल्या होत्या.स्वागताचे फलक लावण्यात आले होते. सकाळीच विद्यार्थी नवीन गणवेश, नवीन वह्या आणि नवा उत्साह घेऊन मोठ्या संख्येने शाळेत आले होते.या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक डॉ.संजीवकुमार सोनवणे, उपमुख्याध्यापक डॉ. आशा शिरसाठ, पर्यवेक्षक कैलास वाघ, ज्येष्ठ शिक्षक एस.डी.मोरे, डी.के.चौधरी आणि शिक्षक वर्गाने गुलाबपुष्प आणि मिठाई देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.के.चौधरी यांनी केले.
यानंतर झालेल्या प्रवेशोत्सव कार्यक्रमात धरणगाव पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी रविकिरण बिऱ्हाडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांची धरणगाव तालुक्यात नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे शाल,बुक आणि बुके देऊन डॉ.संजीवकुमार सोनवणे यांच्या हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी बिऱ्हाडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक योजने अंतर्गत पुस्तके वाटण्यात आली. या कार्यक्रमाचे संयोजन आणि सूत्रसंचालन बापू शिरसाठ यांनी केले. तर आभार प्रदर्शन एनसीसी अधिकारी डी.एस.पाटील यांनी केले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारांतर्गत गोड जेवण देण्यात आले.
















