पारोळा (प्रतिनिधी) पन्नास हजाराची खंडणी मागण्यासह कोयत्याने हल्ला करुन वाळू वाहतूकदारास जखमी केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल देविदास सरदार (रा. तामसवाडी ता. पारोळा) असे संशयित आरोपी असणाऱ्या कथित आरटीआय कार्यकर्त्याचे नाव आहे.
हेमंत मच्छींद्र पवार (वय २०, रा. तामसवाडी) हा वाळूचे ट्रॅक्टर चालवण्याचे काम करतो. दि. १० एप्रिल रोजी तू वाळूचे ट्रॅक्टर चालवतो म्हणून पारोळा पोलिस स्टेशनला तुझ्याविरुद्ध अर्ज केला आहे. तू जर मला पन्नास हजार रुपये दिले तर तुझ्याविरुद्धचे दोन्ही अर्ज मागे घेतो आणि जर नाही दिले तर तुझ्याविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो, अशी राहुल सरदार याने हेमंत पवार याला दिली. तसेच मी आरटीआय कार्यकर्ता असून काहीही करु शकतो, असे म्हणत राहुल सरदार याने हेमंत पवार याला पैशांची मागणी केली.
परंतू वाळू वाहतूकदार तरुण हेमंत पवार याने मी तुला यापुर्वी तेरा हजार रुपये दिले आहेत. आता पैसे देवू शकत नाही, असे राहुल सरदार याला स्पष्ट सांगितले. हेमंतच्या बोलण्याचा राग आल्याने राहुल सरदार याने लोखंडी कोयता दाखवत शिवीगाळ करायला सुरुवात केली. तसेच तू जर गावाच्या बाहेर दिसला तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याचेही हेमंत पवार याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पारोळा पोलिस स्टेशनला गु.र.न. 111/23 भा.द.वि. 384, 385, 324, 504, 506, शस्त्र अधिनियम 4/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. विजय भोई हे करत आहेत.