चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील हातेड खुर्द येथील निवृत्त शिक्षक शिवाजीराव श्रीराम पाटील यांच्या बंद घरात चोरी झाली. चोरट्यांनी रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण ५ लाख २२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.
हातेड खुर्द येथील शिवाजीराव पाटील हे पत्नी सुशीलाबाई, आई अंजनाबाई यांच्यासोबत राहतात. त्यांनी नुकताच मका विकला होता. त्याचे पैसे तसेच आईची पेन्शन आणि नातीसाठी जमवलेले पैसे आणि दोन तोळे वजनाची सोन्याची पोत, एक तोळा वजनाची सोन्याची अंगठी असा एकूण ५ लाख २२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
शिवाजीराव पाटील हे परिवारासह २६ रोजी धुळे येथे मुलाकडे गेले होते. शनिवारी (दि. ४) सकाळी दीपक दगडूलाल जैन यांनी चोरी झाल्याचे कळवले. याबाबत चोपडा ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपअधीक्षक कृषिकेश रावले, पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी घटनास्थळी भेट दिली होती.