नशिराबाद (प्रतिनिधी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची भिंत अंगावर कोसळून एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मोहित योगेश नारखेडे (वय-१३ वर्षे, राहणार- वरची आळी नशिराबाद, तालुका- जळगाव) असे मयत मुलाचे नाव आहे.
नशिराबाद गावातील वरची आळी भागात मोहित हा त्याच्या कुटुंबीयांसह वास्तव्यास होता. मोहित हा सातवीच्या वर्गात शिकत होता. शुक्रवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास मोहित मित्रांसोबत घरापासून पाचशे मीटरच्या अंतरावर असलेल्या सनसवाडी रोडवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ खेळत होता. खेळता खेळता भिंतीला धक्का लागला.
अचानक शाळेची संरक्षक भिंत त्याच्या अंगावर कोसळली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालविली. मुलाच्या मृत्यू झाल्याचे पाहून त्याच्या आई-वडिलांनी जिल्हा रुग्णालयात मोठा आक्रोश केला. धक्कादायक म्हणजे गेल्या सात महिन्यापूर्वी या शाळेच्या संरक्षक भिंतींचे काम करण्यात आले आहे. दरम्यान, ठेकेदाराने भिंतीचे काम चांगल्या दर्जाचे न केल्यामुळे ती आज अचाकन कोसळली. यामुळे निष्पाप मुलाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप मयत मोहितचे वडील योगेश अशोक नारखेडे यांनी केलाय.