जळगाव (प्रतिनिधी) पोलीस म्हटलं की, अनेकांना त्यांचा कठोर रुद्रावतार आणि कारवाईचा दंडुका दिसतो. मात्र, जळगावमधून याच पोलिसांची एक हळवी बाजू समोर आली आहे. शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांनी आज आपला वाढदिवस न साजरा करता एका अडचणीतील दिव्यांग बांधवास मदत करून खाकी वर्दीमागेही संवेदनशील मन दडलेलं असतं, हे दाखवून दिलं आहे.
रविवार दि. 16 एप्रिल रोजी सकाळी गणपती नगरातील किराणा दुकानदार राजेंद्र खिवंसरा यांच्या दुकानाला आग लागली होती. गेल्या ३० वर्षापासून याच दुकानाच्या माध्यमातून खिवंसरा हे आपला आणि बहिणीसह भाचीचा उदरनिर्वाह करत होते. मात्र, या आगीत किराणा दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे खिवंसरा हे प्रचंड हवालदील झाले होते. आता या अडचणीतून बाहेर कसं पडणार?, पुन्हा एका नव्याने व्यवसाय सुरु करता येईल का?, याच विवंचनेत असतांना एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार अतुल वंजारी हे मदतीला धावून आले. खरं म्हणजे घटना घडल्यापासून हायक फौजदार वंजारी हे प्रचंड अस्वस्थ होते. खिवंसरा यांना मदत करायचीच त्यांनी मनोमन घटनेच्या दिवशीच ठरवून टाकलं होते.
मग काय अतुल वंजारी यांचा आज 19 एप्रिल 2023 रोजी वाढदिवस होता. परंतू त्यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. एवढेच नव्हे तर दुकानदार राजेंद्र खिवंसरा यांना व्यवसाय सुरु करण्यास भरीव आर्थिक मदत केली. याप्रसंगी अतुल वंजारी यांच्या समवेत रोशन पगारीया, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे साईनाथ मुंडे, पोलिस बॉईज अनिल सोनवणे आदी उपस्थित होते. खाकी वर्दीमागे दडलंय संवेदनशील मन बघून आज अनेकांनी म्हटलं पोलीसदादा लय भारी !