नंदुरबार (प्रतिनिधी) शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील यात्रेनिमित्त दारु वाहतूक करु देण्याच्या मोबदल्यात १० हजारांची लाच स्विकारतांना पोलिस निरीक्षकासह चालक पोलिस शिपायास नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.
तक्रारदार यास सारंगखेडा येथे यात्रोनिमित्त दारु वाहतूकीचा व्यवसाय करावयाचा असल्याने सारंगखेडा पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक संदिप उत्तमराव पाटील (वय ४४) व चालक पोलिस शिपाई गणेश भामट्या गावित (वय ३८) यांनी तक्रादाराकडून २१ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती १० हजार रुपये इतकी रक्कम देण्याचे ठरले होते. यादरम्यान तक्रारदाराने नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. ठरल्याप्रमाणे काल पोलिस शिपाई गणेश गावित १० हजाराची लाच स्विकारत असतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
सदरची कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलिस अधिक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अपर पोलिस अधिक्षक माधव रेड्डी, पोलिस उपअधिक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्यासह सापळा पथकातील पोहेकॉ. सचिन गोसावी, प्रफुल्ल माळी यांच्या पथकाने केली आहे.