भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ शहरातील बसस्थानकाजवळ एका कारला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. गाडीचा चालक विकी साबने यांनी वेळेत प्रसंगावधान दाखवून गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि बाहेर पडल्यामुळे मोठा अपघात टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, विकी साबने हे रविवारी, ४ जानेवारी रोजी दुपारी सुमारे १:३० वाजता आपल्या कारने घराच्या दिशेने जात असताना जवळच्या पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरून आले होते. बसस्थानकाजवळ गाडी चालवताना अचानक कारच्या इंजिनमधून धूर उठू लागला. चालकाने काही क्षणातच गाडी थांबवली आणि बाहेर पडल्यानंतर काही सेकंदांतच कारने भीषण आग पकडली. गर्दी असलेल्या परिसरात अचानक जळती कार पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. अनेकांनी त्वरित आपले वाहन बाजूला करून सुरक्षित अंतरावर उभे राहिले, तर काहींनी धैर्य दाखवून अग्निशमन दलाला मदत केली.
घटनास्थळी त्वरित भुसावळ नगरपालिकेचे अग्निशमन दल पोहोचले आणि त्यांनी कारवर लागलेली आग शर्थीने आटोक्यात आणली. या आगीत कारला मोठा नुकसान झाले आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही; परंतु प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किट किंवा इंजिनमधील तांत्रिक खराबीमुळे ही घटना घडली असावी, असे समजते. गर्दी असलेल्या बसस्थानक परिसरात ही घटना घडल्यामुळे वाहतुकीवर सुमारे अर्धा तास परिणाम झाला. भुसावळ पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरु केला आहे. पोलिस आणि अग्निशमन विभाग नागरिकांना अशा प्रसंगी त्वरित सुरक्षित अंतर ठेवण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन करत आहेत. भुसावळच्या रहिवाशांनी ही घटना भयावह मानली, तरीही चालकाच्या धैर्य आणि अग्निशमन दलाच्या त्वरीत कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.
















