छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) भरधाव ट्रकने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून येणारी एक दुचाकी ट्रकला जोरात धडकली. या अपघातात दुचाकीवरील एका दोन वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला, तर आई-वडील गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात रविवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास शिऊर बंगला ते मालेगाव मार्गावरील शिंदीनाला फाट्याजवळ घडला.
जिहान सलमान शहा असे मृत बालकाचे नाव आहे. तर सना सलमान शाह, त्यांचे पती निजामशहा (सर्व मूळचे बनशेंद्रा, हल्ली मुकाम मालेगाव) असे जखमी झालेल्यांचे नावं आहेत. शाह कुटुंब मालेगावहून खुलताबाद येथे आपल्या दुचाकी उरुसाला निघाले होते. रविवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास शिंदीनाला फाटानजीक धनेश्वर वस्तीजवळ आले असता, पुढे जाणाऱ्या आयशर ट्रकने रस्त्यावरील मोठ्या खड्यांमुळे अचानक ब्रेक दाबल्याने आयशरच्या मागून दुचाकीने जोराची धडक दिली.
या अपघात पुढे बसलेल्या दोन वर्षीय जिहानच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो जागीच ठार झाला. तर सना शाह या दुचाकीवरून खाली पडल्याने त्यांच्याही डोक्याला गंभीर मार लागला तर सलमान शाहदेखील जखमी झाले. अपघातानंतर चालक ट्रकसह फरार झाला. स्थानिक नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले.