अकोला (प्रतिनिधी) दाम्पत्याला मदत करण्याच्या बहाण्याने युवकाने त्यांची बॅग वर ठेवली आणि त्यातून १८ लाख रुपयांचे दागदागिने चोरुन घेतले होते. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) हरियाणातून सराईत चोरट्याला अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून १८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अमित पिता बिजेंद्र (३४) रा. रूरकी, ता. जि. रोहतक, हरयाणा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
दि. १० फेब्रुवारी २०२४ रोजी फिर्यादी सतीष बाबुराव गंगाळे (६० वर्ष) रा. उमरी हे त्यांचे पत्नीसह बसने औरंगाबाद जात असतांना वाशिम बायपास दरम्यान त्यांचेकडील लाखो रूपयांचे सोन्याचे दागीने व २ लाख ८० हजाराची रोकड चोरी झाली होती. याप्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाच्या तपासात अकोला एलसीबीचे पथक दि. १३ फेब्रुवारी रोजी आरोपीचा शोध घेण्यासाठी हरियाणा रोहतक येथे रवाना झाले होते. संशयीत आरोपी हे रोहतक (जि. हिस्सार) या भागातील हरियाणा राज्यातील होते. परंतु सदर भागात किसान आंदोलन चालु असल्याने रस्ते व मोबाईल नेटवर्क पुर्णपणे बंद असल्याने तपास पथकाला अडचणी निर्माण झाल्या. अगदी स्थानिक पोलीसांची मदत मिळण्यासही मोठी अडचण आली. यामुळे पथकाला तपास करणे आव्हानात्मक होते. परंतू गोपनिय माहिती व खबरींचे नेटवर्क वापरून सदर पथकाला ८ दिवसाच्या अथक परिश्रमा नंतर संशयीत आरोपी अमीत पिता बिजेंद्र याला ताब्यात घेण्यात यश आले.
आरोपीकडून सदर गुन्हयात चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामध्ये १) एक सोन्याचा नेकलेस, ०४ सोन्याच्या अंगठया, सोन्याचे चैन, सोन्याची लगडी, कानातले जोड, राणी हार व इतर सोन्याचे दागीने व २) काळ्या मन्याची पोत सोन्याचे पेडॉल सह असे एकुण २७५ ग्रॅम सोन्याचे दागीने व नगदी १.५० लाख रूपये असा एकुण १८ लाख रूपयांचा मुद्देमाल रोहतक राज्य हरियाणा येथुन जप्त करण्यात आला. नमुद आरोपी हा लक्झरी बस स्टॅण्ड, बस स्थानक येथे वयस्कर लोकांवर पाळत ठेवुन त्यांचे सुटकेस, बॅग उचलण्यास मदतीचा बहाणा करून सुटकेस बॅग मधील रोख रक्कम, सोन्याचे दागीने चोरी करण्यात सराईत आहे.
उमरी येथील सतीश बापूराव गंगाळे (क्य ६०) व त्यांच्या पत्नी दोघे १० फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथे नातेवाईकांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी जात होते. ते अकोला बस स्थानकाहून संभाजीनगरच्या बसमध्ये बसले होते. त्यांच्या मागच्या सीटवर एक युवक बसला होता. गंगाळे दाम्पत्य त्यांच्याकडील बॅग वर सीटवर ठेवत ‘थांबा काका मी ठेऊन देतो तुमच्या थैल्या’ असे मागे बसलेला युवक म्हणाला व त्यांच्या हातातील पिशवी व बॅग त्याने घेतली आणि वर कॅरीअरवर ठेऊ लागला. दरम्यान, त्यांची नजर चुकवून त्याने बॅगेतील २ लाख ८० हजार रुपये व २७० ग्रॅम वजनाचे दागिने काढून घेतले होते. त्यानंतर तो चोरटा ‘बस वाशीम जाती क्या?’ असे म्हणून वाशीम बायपास येथे उतरुन गेला होता. बॅग उघडी दिसल्याने चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.