जळगाव (प्रतिनिधी) अनेक प्रलंबित मागण्यांसाठी महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचारी सेवक संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली २२ नोव्हेंबर रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात येणार आहे. तसेच हिवाळी अधिवेशनस्थळी मोर्चा काढण्यात येणार आहे. दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास डिसेंबर महिन्यात बेमुदत बंद आंदोलन पुकारण्यात येणार आहे.
मागण्यासंदर्भात गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समिती व कृती समितीत सहभागी महासंघ यांच्या माध्यमातून सातत्याने शासनाला निवदने, भेटी व बैठकांद्वारे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, शासनाकडून केवळ आश्वासन मिळत असून, कोणतेही प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळे महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली २२ नोव्हेंबरला एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात येणार आहे. या नंतरही मागण्या मान्य न झाल्यास डिसेंबर महिन्यात अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालये बेमुदत बंद आंदोलन पुकारण्यात येणार आहे.
विद्यापीठातील शिक्षक, विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांना सातवा वेतन आयोगाची थकबाकी देण्याचा निर्णय घेतला गेला. मात्र, विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना थकबाकी न देण्याचा अन्यायकारक निर्णय घेण्यात आला. इतकेच नाही, तर विद्यापीठातील ७९६ पदांना अजून सातवा वेतन लागू केलेला नाही, तो लागू करावा, रद्द केलेली सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना सुरू करावी, ५८ महिन्यांची थकबाकी द्यावी. या प्रमुख मागण्यांसह इतर महत्त्वाच्या मागण्यांचा समावेश आहे.