गोंदिया (वृत्तसंस्था) तालुक्यातील एकोडी दांडेगाव येथे तवेरा वाहनाला अपघात होऊन ५ जणांचा मृत्यू तर ५ प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली. तिघांचा घटनास्थळी तर दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींना तात्काळ उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि केटीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंगाझरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला आहे.
साखरपुड्यासाठी जात होती ४ वाहने !
तिरोडा तालुक्याच्या करटी येथील विनोद कितकीचंद इनवाते याचा साखरपुडा मजीतपूर येथील दिव्या संतोष उईके हिच्यासोबत असल्याने त्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी तवेरा (एमएच ४० ए ४२४३) या वाहनाने जात असताना दांडेगाव येथील बसस्थानकावरून ही कार वेगात धावत असताना चालकाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे कारने तीन वेळा पलटी झाली आणि विद्युत खांबावर धडकली.
दीड वर्षाचा देवांश १५ मीटर फेकला गेला !
कारचा वेग अधिक असल्याने अपघात होताच दिड वर्षाचा देवांश विशाल मुळे हा रस्त्यापासून १५ मिटर अंतरावरील रोहिणी प्रसाद बिरनवार यांच्या घरी फेकल्या गेला. तो गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी गोंदियाला नेताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.
मृतांची आणि जखमींची नावे !
मृतांमध्ये छाया अशोक इनवाते (५८), अनुराधा हरिचंद कावळे (५०), देवांस विशाल मुळे (दीड वर्ष), मनकुमार भोयर (६५, सर्व रा. करटी) आणि सरस्वती ग्यानीराम उईके (७०, रा. परसवाडा) यांचा समावेश आहे. या अपघातात गीता प्रीतिचंद इनवाते (५५, रा. करटी, ता. तिरोडा), पद्मा राजकुमार इनवाते (५०, रा. भुराटोला तिरोडा), बिरजुला गुडन ठाकरे (३५, रा. आरम्भाघोटी, जि. बालाघाट), अहिल्याबाई नामदेव कोडवाते (६२, रा. करटी तिरोडा) तसेच वाहनचालक अतुल नानाजी पटले (२३, रा. अर्जुनी परसवाडा) हे किरकोळ जखमी झाले आहेत.