गोंदिया (वृत्तसंस्था) लग्नसमारंभ आटोपल्यानंतर मोटारसायकलने घरी परत जाणाऱ्या मोटारसायकलला भरधाव टिप्परने धडक दिल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रामनगर भागवत टोलाजवळ घडली. या अपघातात दोन जण देखील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आदित्य कुमेंद्र बिसेन (७), कुमेंद्र बुधराम बिसेन (३७) (रा. सितूटोला दासगाव) व आर्वी कमलेश तूरकर (५ ) (रा. इंदिरानगर पिंडेकपार) असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. मोहीत कुमेंद्र बिसेन (९) व माहेश्वरी कुमेंद्र बिसेन (३०) दोन्ही सितूटोला दासगाव असे गंभीर जखमी असलेल्या मायलेकांची नावे आहेत.
गोंदिया तालुक्यातील पिंकेपार येथील लग्न सोहळा आटोपून शनिवारी दासगाव येथील बिसेन कुटुंबीय मोटारसायकल क्र. (सीजी ०४ सीएस ५७५५) ने घरी परत जात होते. ढाकणी ते भागवतटोला या रस्त्यावर टिप्पर (एमएच ३ के ०२९८) ने बिसेन कुटुंबीयांच्या मोटारसायकल धडक दिली. या अपघातात आदित्य बिसेन, कुमेंद्र बिसेन, आर्वी तूरकर या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर मोहीत बिसेन व माहेश्वरी बिसेन हे मायलेक गंभीर जखमी झालेत. अपघातानानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती रामनगर पोलीसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रूग्णालयात दाखल केले. मृतदेह गोंदिया जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आलेत. तर टिप्पर चालकाविरुद्ध रामनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.