पाचोरा (प्रतिनिधी) एका भयंकर अपघाताने दोन तरुणांचे पूर्ण आयुष्य बरबाद केल्याची घटना शुक्रवारी पहाटे चौकातील दत्त मंदिराजवळ घडली आहे. भरधाव वेगात आलेल्या एका पिकअपने दुचाकीला धडक दिल्यानंतर उपचारादरम्यान दोघांचे पाय कापावे लागले आहेत. विनोद बारकू पाटील (३२) आणि वसंत भाईदास सोनवणे (३५), असे कायमचे अपंगत्व आलेल्या तरुणांची नावे आहेत.
वाशी, मुंबई येथून फळे घेऊन अकोला येथे जाणारी मालवाहतूक पिकअप शुक्रवारी पहाटे ५:३० वाजेच्या सुमारास भडगावकडून पाचोराकडे येत होती. याचवेळी पिकअपने महाराणा चौकातील दत्त मंदिराजवळ उभ्या असलेल्या दुचाकीस्वार व रिक्षाची वाट पाहत असलेल्या प्रवाशास जोरदार धडक दिली. या अपघातात ३ जण गंभीर जखमी झाले. पहाटे फिरायला निघालेल्या काही व्यक्तींनी तातडीने तिघा जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल केले.
वसंत भाईदास सोनवणे (३५) हे सुरतहून पाचोऱ्यात नातेवाइकांकडे लग्नासाठी आले होते. ते ट्रॅव्हल्समधून उतरून रिक्षाची वाट पाहत उभे होते. त्याच ठिकाणी अमोल उमेश वाघ (30, पाचोरा) हा वडिलांना घेण्यासाठी आला होता. तर विनोद बारकू पाटील (३२) व कमलेश परदेशी (१९, पुनगाव) हेदेखील तेथे नातेवाइकांची वाट पाहत थांबले होते. याचवेळी मालवाहतूक पिकअपने धडक दिली. या अपघातात विनोद पाटील व वसंत सोनवणे यांचे उपचारादरम्यान पाय कापण्यात आला. त्यामुळे त्यांना कायमचे अपंगत्व आले. दरम्यान, कमावत्या वयात दोघांना कायमचे अपंगत्व आल्यामुळे त्यांचे आयुष्य बरबाद झाले आहे. त्यामुळे दोघांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. पोलिसांनी पिकअप चालक श्रावण रतनसिंग घोती (३६, मोताळा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.