धुळे (प्रतिनिधी) जिल्ह्यातील साक्री तालुक्यात माळ माथ्यावर चिपलीपाडा गावाबाहेर असलेल्या मेणबत्ती निर्मितीच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात चार मजूर महिला होरपळून जागीच ठार झाल्याची घटना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. या स्फोटात अन्य काही मजूर जखमी झाले आहेत.
मयतांमध्ये आशाबाई भैया भागवत (वय ३५) आणि राजश्री भैया भागवत (वय १५), नयना संजय माळी, सिंधुबाई धुडकू राजपूत या चोघांचा समावेश आहे. धुळ्यातील साक्री तालुक्यातील चिपलीपाडा येथे भवानी सेलिब्रेशन या मेणबत्ती निर्मिती करणाऱ्या कारखान्यात मंगळवारी दुपारी अचानक स्फोट झाला. या भीषण स्फोटात चार महिलांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. तर तेथील दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. या भीषण स्फोटामागील कारण अद्याप कळू शकलेले नाही. जखमींना स्थानिक नागरिकांनी तात्काळ नंदुरबार येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दोन्ही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. तर मयत मजूर जैताने येथील राहणारे असल्याचे समजते.