जळगाव (प्रतिनिधी) गांधी टोपी घालून कुरीअर देण्याच्या बहाणा करीत अपार्टमेंटमध्ये शिरलेल्या चोरट्याने दोन बंद घराचा कडी कोयंडा तोडून ऐवज लांबविला. ही घटना मंगळवारी दुपारी आदर्श नगरातील सुरुधी अपार्टमेंटमध्ये घडली. एका घरात दोन मुले झोपलेले असतांना देखील चोरट्याने तेथून रोकड आणि सोन्याचे दागिने लांबविले. याप्रकरणी पोलीसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नव्हती.
कुरीअर देण्याच्या बहाणा !
शहरातील आदर्श नगरात सुरुधी अपार्टमेंट असून याठिकाणी नानक कारडा हे व्यावसायीक वास्तव्यास आहे. मंगळवारी सकाळी नानक हे एमआयडीतील फॅक्टरीवर निघून गेले. त्यानंतर दुपारच्या सुमारास डोक्यावर गांधी टोपी घालून चोरटा कुरीयर देण्याच्या बहाण्याने अपार्टमेंटमध्ये शिरला. पहिल्या मजल्यावरील एका घराची बेल वाजवित त्याने ओस्वाल यांचे कुरीयर आले असल्याचे सांगितले. परंतु घरात काम करणाऱ्या मोलकरणीने ते याठिकाणी राहत नसून त्यांचा मोबाईल नंबर नाही का?, असं विचारल्याने चोरटा सावध झाला आणि तो चोरटा तेथून निघून गेला. काही वेळानंतर मोलकरणीने अपार्टमेंटमधील इतर घरातील कामे आटोपून त्या अपार्टमेंटमधून बाहेर पडल्या. त्याचवेळी तिसऱ्या मजल्यावर राहणारे नानक कारडा यांच्या पत्नी दोन मुलींना सोबत घेतले तर दोघांना घरात झोपवून त्या आधारकार्डमधील दुरुस्ती करण्यासाठी दरवाजाला बाहेरून कुलूप लावून त्या निघून गेल्या.
२५ हजाराची रोकड व २५ हजाराचे दागिने लंपास !
मोलकरीन अपार्टमेंटमधून बाहेर पडल्याचे दिसल्यानंतर परिसरात दबा धरुन बसलेल्या चोरट्याने पुन्हा एकदा अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तिसऱ्या मजल्यावर जावून त्याने कारडा यांच्या फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून २५ हजाराची रोकड व २५ हजाराचे दागिने चोरले. त्यानंतर समोर एअर होस्टेस मुलींचे बंद फ्लॅट सुध्दा चोरटयाने फोडले. मात्र, तिथे त्याला रोकड, दागिने न मिळाल्याने चोरटा तेथून पसार झाला. काम आटोपून घरी परतल्यानंतर नानक कारडा यांच्या पत्नीला दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसून आला. त्यांनी घटनेची माहिती त्यांच्या पतीला दिली. त्यानंतर रामानंद नगर पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथक व ठसे तज्ज्ञांचे पथक घटनास्थळाहून काहीही मिळून आले नाही.
रेकॉर्डवरील चोरट्याचे फोटो दाखविताच मोलकरणीने ओळखले !
पोलिस घटनेची चौकशी करीत असतांना अपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या मोलकरणीने या घटनेपुर्वी अंदाजे ५० वर्षीय कुरीयरवाला असल्याचे सांगितले. पोलिसांनी लागलीच रेकॉर्डवरील काही अट्टल चोरटयांचे फोटो त्यांना दाखविले. ते फोटो बघताच मोलकरणीने एका चोरट्याला ओळखले. तो संशयित सराईत चोरटा गोकूळ राठोड असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. गेल्या दीड महिन्यापासून राठोड हा शहरात नव्हता. तो शहरात येताच त्याने चोरी करण्यास सुरुवात केली आहे.