जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात घरफोडी आणि दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहा वर्षांपासून फरार असलेल्या सुरेश राजाराम बारेला (२५, रा. देवळी, जि. बडवानी, ह.मु. चोपडा) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवार, २७ फेब्रुवारी रोजी मुद्देमालासह चोपडा येथून अटक केली आहे. त्याच्याकडून घरफोडीतील साहित्य आणि चोरीच्या तीन दुचाकी असा एकूण एक लाख ४८ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
चोपडा शहर पोलिस ठाण्यात सन २०१७मध्ये दाखल चोरीच्या गुन्ह्यात सुरेश बारेला हा सहा वर्षांपासून फरार होता. त्याच्यावर जळगाव तालुका, धरणगाव, अमळनेर, चोपडा शहर आणि शिरपूर पोलिस ठाण्यात वेगवेगळे एकूण सात गुन्हे दाखल आहेत. सहा वर्षांपासून तो फरार होता. ते चोपडा शहरातील महात्मा गांधी रोड परिसरात दुचाकीवर फिरत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोहेकॉ कमलाकर बागुल, संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, गोरख बागूल, अनिल देशमुख, संदीप साळवे, पोलिस नाईक ईश्वर पाटील, महेश सोमवंशी, लोकेश माळी पथकाने मंगळवार, २७ फेब्रुवारी रोजी सापळा रचून सुरेश बारेला याला चोरीच्या दुचाकीसह अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली. चोरीतील मुद्देमाल आणि तीन चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी त्याला तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.