धरणगाव (प्रतिनिधी) अवैध वाळू वाह्तुकीच्या मुद्द्यावरून जिल्ह्यात रान माजलेले असतांना भरदिवसा चक्क धरणगाव उड्डाणपुलावर वाळूने भरलेला ट्रक बंद अवस्थेत उभा आहे. या ट्रकमुळे वाहतुकीस अडथळा होतोय. धक्कादायक म्हणजे घटनास्थळी ट्रकचा ड्रायव्हर देखील नाहीय.
मागील काही दिवसापासून अवैध वाळू वाह्तुकीच्या मुद्द्यावरून जिल्ह्यात महसूल विभागावर गंभीर आरोप होत आहेत. कारण वाळू वाहतूक पूर्णपणे बंद असूनही नदी पत्रातून बिनधास्तपणे वाळू उपसा होत असल्याचे माध्यमांनी समोर आणले होते. तशात आज सकाळी साडेअकरा वाजेपासून वाळूने भरलेला ट्रक (एमएच १८ एनए २६८१) हा धरणगाव उड्डाणपुलाच्या चढतीवर सुरुवातीलाच मधोमध बंद पडून उभा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक प्रभावित झाली आहे. दरम्यान, घटनास्थळी ट्रकचा ड्रायव्हर देखील नाहीय. त्यामुळे हा ट्रक नेमका कुणाचा? आणि वाळू उपसा बंद असतानाही भरदिवसा हा ट्रक कसा काय वाळू वाहतूक करतोय?, याबाबत गावात उलट सुलट चर्चा सुरु आहेत. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीस प्रशासन ट्रक बाजूला घेण्यासाठी क्रेन मागवत असल्याची माहिती मिळाली आहे.