भंडारा (वृत्तसंस्था) घरासमोरील पाण्याच्या टाकीत पडून एका दोन वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घटना शनिवारी (ता. २०) सायंकाळी लाखांदूर तालुक्यातील मांढळ येथे घडली. त्रिषा अरविंद मिसार असे मृत बालिकेचे नाव आहे.
या संदर्भात अधिक असे की, अरविंद मिसार मांढळ येथे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. मिसार राहत असलेल्या परिसरात नळाचे पाणी व्यवस्थित पोहचत नाही. त्यामुळे नागरिकांनी निदान पिण्यासाठी पाणी मिळावे यासाठी नागरिकांनी घरासमोरील अंगणात सिमेंट काँक्रीटचा खोल खड्डा तयार केला आहे. मिसार यांच्या घराच्या अंगणात देखील पाण्याची टाकी आहे. पाण्याच्या टाकीत उतरण्यासाठी पायऱ्या देखील आहेत. शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास बालिका त्रिशा घरासमोरील अंगणात खेळत होती. खेळता खेळता ती जवळपास ३ फूट पाणी असलेल्या पाण्याच्या टाकीत पडली. घटना लक्षात येताच कुटुंबीयांनी तत्काळ त्रिशाला पाण्याबाहेर काढत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले. दरम्यान, या घटनेनंतर कुटुंबीयांचा मन हेलावणारा आक्रोश बघून उपस्थितांचे डोळे पाणावले होते.
















