अहिल्यानगर (प्रतिनिधी) ओळखीचा गैरफायदा घेत सराफ व्यावसायिकाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून नंतर त्यांच्या दोघांचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढून ते कुटुंबियांना व नातेवाईकांना पाठविण्याची धमकी देत केडगाव येथील एका महिलेने तिच्या पतीच्या मदतीने सराफ व्यावसायिकाकडून वेळोवेळी रोख स्वरुपात व फोन पे द्वारे सुमारे २७ लाख ५६ हजार ८१४ रुपये उकळले असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत उरुळी कांचन, पुणे येथील सराफ व्यावसायिकाने कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून त्यास ब्लॅकमेल करणारी महिला व तिच्या पतीवर गुन्हा दाखल केला आहे.
उरुळी कांचन येथे एका महिलेने त्याच्या सोन्याच्या दुकानातून सन २०१२ मध्ये आक्कासाहेब डोरले खरेदी केले होते. सदर डोरले तिच्या केडगाव येथील बहिणीला आवडले, त्यामुळे तिने तिच्या बहिणीकडून फिर्यादी सराफ व्यावसायिकाचा मोबाईल नंबर घेवून त्यावर त्यांच्याशी संपर्क साधला. मलाही माझ्या ताईसारखे डोरले करायचे आहे, असे सांगितले. त्यानंतर वेळोवेळी फिर्यादीसोबत फोनवर बोलून जवळीक वाढविली.
सोमाटणे फाटा येथे असलेल्या बहिणीच्या घरी महत्वाचे काम आहे, असे सांगून फिर्यादीला बोलावून घेतले. तेथे मुक्कामी थांबायचा आग्रह करून माझे तुमच्यावर प्रेम आहे, असे सांगितले व फिर्यादीशी जवळीक साधून त्यास प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी भेटायला बोलावून त्यांचे दोघांचे एकत्रित फोटो व व्हिडीओ गुपचूप मोबाईलमध्ये काढले. २०२० मध्ये कोरोना काळात पतीला कुठेही काम नाही, त्याला तुमच्या दुकानात कामाला ठेवा, असे सांगितले. तिचा पती उरुळी कांचन येथील फिर्यादीच्या दुकानात काही दिवस काम करत होता. त्यानंतर एक दिवस नगरला जावून येतो, असे सांगून फिर्यादीची मोपेड घेवून गेला.
काही दिवसांनी त्याला फोन केल्यावर मी आता नगरमध्येच काम करतोय, मोपेड काही दिवस माझ्याकडे राहू द्या, मी नंतर आणून देतो, असे सांगितले. त्यानंतर २२ नोव्हेंबर २०२२ रोजी त्या महिलेने फिर्यादीला महत्वाचे काम आहे, असे सांगून नगरला बोलावले. त्यावेळी तिचा पतीही तेथे होता. त्या दिवशी त्या महिलेने फिर्यादीला आपल्या दोघांचे फोटो, व्हिडीओ माझ्याकडे आहेत, ते तुझ्या कुटुंबियांना व नातेवाईकांना पाठवून देईल, अशी धमकी देत पैशांची मागणी केली. त्यावेळी त्याने रोख ३० हजार रुपये तिला दिले. त्यानंतर पार्लरचे दुकान टाकायचे आहे, घर घ्यायचे आहे, नवी मोपेड घेवून द्या, असे म्हणत फेब्रुवारी २०२५ पर्यंत वेळोवेळी रोख व फोन पे द्वारे फिर्यादीकडून २७ लाख ५६ हजार ८१४ रुपये धमकी देत घेतले. २७ मार्चला पुन्हा धमकावत पैशांची मागणी केली. वारंवार होणाऱ्या या लुबाडणूकीला आणि त्रासाला कंटाळून अखेर ६ एप्रिल रोजी सदर सराफ व्यावसायिकाने नगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी केडगावची ती महिला व तिच्या पती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे