चोपडा (प्रतिनिधी) शहरात बाजारपेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर तालुक्यातील कुसुंबे येथील मदन माधवराव पाटील यांच्या भाजीपाल्याच्या पिशवीमधून अडीच लाखांची रोख रक्कम दि. ७ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एका अज्ञात महिलेने लंपास केल्याचीखळबळजनक घटना घडली.
तालुक्यातील कुसुंबे येथील रहिवासी असलेले मदन पाटील यांनी दुपारी २ वाजेच्या सुमारास स्टेट बँक ऑफ इंडियामधून ३ लाख रुपयांची रक्कम काढली होती. या तीन लाखांपैकी अडीच लाख रुपयांची रोख रक्कम त्यांनी वायरच्या भाजीपाल्याच्या पिशवीत ठेवली होती. तर ५० हजार रुपये आपल्या खिशात ठेवले होते. दरम्यान, मदन पाटील यांनी दुपारी २.३० वाजता आंबेडकर पुतळ्याजवळ दुचाकी लावली. त्यानंतर ते भाजीपाला घेण्यासाठी थांबले. या वेळी एका महिलेने त्यांच्यावर पाळत ठेवत त्यांच्या पिशवीतील अडीच लाख रुपयांची रोकड लंपास केली. ही महिला स्टेट बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात २.२० वाजता दिसत असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील पंकज बिल्डर्सच्या कार्यालयातील कॅमेऱ्यात ही ती महिला त्या वायरच्या पिशवीमधून पैसे घेऊन जाताना दिसत आहे.
या महिलेचा तपास कुसुंबा येथील ८ ते १० जणांनी तपास करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती महिला कुठेही आढळून आली नाही. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जाऊन दुकानदारांची विचारपूस करत कॅमेऱ्याची तपासणी केली. याप्रकरणी मदन पाटील यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.