चोपडा प्रतिनिधी
गावाकडे आलेली महिला नातेवाईकांकडे धरणगाव येथे जाण्यासाठी गर्दीत बसमध्ये चढत असतांना महिलेच्या गळ्यात असलेली सोन्याची मंगलपोत अज्ञात चोरट्याने ओरबाडून लंपास केल्याची घटना रविवारी दुपारी १ वाजता चोपडा बसस्थानकावर घडली दरम्यान सोनसाखळी चोरीच्या घटनेने शहरात खडबळ उडाली आहे. तर महिलेच्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. दरम्यान बसस्थानक आवारात पोलीसांचा बंदोबस्त लावण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे
चोपडा तालुक्यातील वढोदा येथील मूळ रहिवाशी ह.मु. कल्याण येथे वास्तव्यास असलेल्या मंगला नामदेव पाटील (वय-५०) ह्या मुलगा जितेंद्र पाटील सोबत २० डिसेंबर रोजी लग्नासाठी वढोदा येथे आलो होतो दरम्यान मुलगा लग्न आटोपून एकटा कल्याण येथे निघून गेला त्या नंतर मंगला पाटील या दि.२२ डिसेंबर रोजी रविवारी नातेवाईकांकडे पिंप्री (ता. धरणगाव) जाण्यासाठी बभळाज (ता. शिरपूर) येथून बसमध्ये चोपडा बसस्थानकावर पोहचल्या. त्या ठिकाणी प्लॅटफार्म क्रमांक-३ वर धरणगावकडे जाण्यासाठी बसची वाट पहात बसल्या होत्या.
रविवारी दुपारी धरणगावकडे जाणारी जळगाव बस लागली. रविवारी लग्नाची तिथी असल्याने बसस्थानकावर मोठी गर्दी होती. यावेळी गर्दीत बसमध्ये चढत असतांना कुणीतरी साडी ओढल्याचे मंगला पाटील यांच्या लक्षात आले. परंतु बसमध्ये चढल्यानंतर बघितले, असता गळ्यात सोन्याची मंगळपोत दिसून आली नाही म्हणून बसमधील प्रवाशांसह चालक, वाहकांकडे तक्रार केली यावेळी बसस्थानकावरी पोलीसांसह प्रवाशांनी चौकशी केली परंतु सोन्याची मंगलपोत आढळून आली नाही शेवटी मंगला पाटील यांनी वढोदा येथे पती नामदेव हिरामण पाटील यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांसह आल्यावर बसस्थानकावर चौकशी केली. परंतु मंगलपोत मिळून आली नाही त्यानुसार चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.