जळगाव (प्रतिनिधी) ऑनलाइन जॉबची ऑफर देवून वैद्यकिय शिक्षण घेणाऱ्या राहुल कृष्णा चौधरी (वय २६, रा. झेडपी कॉलनी) या तरुणाला सायबर ठगांनी ४ लाख ७२ हजार रूपयात गंडविले. ही घटना बुधवारी उडकीस आल्यानंतर त्या तरुणाने जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार सायबर ठगांविरूध्द फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील झेडपी कॉलनीमध्ये राहुल कृष्णा चौधरी हा तरूण कुटूंबासह वास्तव्यास असून वैद्यकिय शिक्षण घेत आहे. दि. ७ ऑक्टोबर रोजी राहुल याला टेलीग्रामवर एक मेसेज आला. समोरील व्यक्तीने आपण रमा लक्ष्मी प्राइस रनर कंपनीतून बोलत असून तुम्हाला ऑनलाइन जॉब पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क करा, असे नमूद केले होते. या मेसेजकडे राहुल यांनी दुर्लक्ष केले. पुन्हा दि. ११ ऑक्टोबरला त्याला मेसेज आला, जॉबवर ऑफर असून आठ हजार रूपये भरल्यावर तुम्हाला कामाला सुरूवात करता येईल असे सांगण्यात आले.
राहुल यांनी पैसे भरल्यावर ठगांनी तुम्हाला लक्झरी प्रोडक्ट मिळाले असून ते मिळविण्यासाठी १५ हजार रूपये भरावे लागतील सांगितले. ही रक्क्म देखील त्यांनी भरल्यानंतर ठगांनी राहुल यांचा विश्वास संपादन करण्यासाठी ९ हजार ८०० रूपये त्यांच्या खात्यावर पाठविले. समोरच्यांकडून आपली फसवणूक झाल्याचे राहुल चौधरी यांना लक्षात आल्यावर त्यांनी पैसे परत मागितले. मात्र, ठगांनी पैसे परत न केल्याने आपली फसवणूक झाल्याने बुधवारी राहुल चौधरी यांनी जिल्हापेठ पोलिसात धाव घेवून संपूर्ण हकीकत सांगितली. त्यानंतर संबंधित सायबर ठगांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहकॉ महेंद्र पाटील हे करीत आहे.
रक्कम काढण्यासाठी मागितले अडीच लाख !
दि. १९ ऑक्टोबरला पुन्हा मेसेज पाठवत आमच्या वेबसाइटवर तुमच्यासाठी आणखी ऑफर आहे. ३० हजार रूपये भरावे लागतील सांगितल्यावर राहुल याने पुन्हा ३० हजार रूपये भरून ऑनलाइन कामाला सुरूवात केली. यानंतर वेळोवेळी एकूण ४ लाख ७२ हजार रूपयांची रक्कम राहुल याने पाठविली. ती रक्कम काढण्यासाठी सुध्दा त्यांच्याकडे अडीच लाख रूपयांची मागणी करण्यात आली.