जळगाव (प्रतिनिधी) लाईट गेल्यामुळे तक्रार देण्यासाठी जाणाऱ्या तरुणांचा वाढदिवस साजरा करणाऱ्यांनी पाठलाग केला. त्यानंतर विशाल रमेश बंसवाल (मोची) (वय २६, रा. रामेश्वर कॉलनी) या तरुणावर धारदार शस्त्राने वार करीत हत्या केली. तसेच त्याच्यासोबत असलेल्या चुलत भावासह मित्रावर देखील वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. ही घटना दि. १८ रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास दिक्षीतवाडीतील मटन मार्केटजवळ घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल केला असून संशयित आकाश सुकलाल ठाकूर उर्फ खंड्या (रा. तुकारामवाडी) व भूषण रमेश अहिरे (रा. पिंप्राळा) या दोघांना जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली.
शहरातील रामेश्वर कॉलनीत विशाल बंसवाल हा तरुण वास्तव्यास होता. त्यांचे काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाजवळ वेल्डींगचे दुकान असून तो वडीलांना दुकानावर हातभार लावित होता. विशालचे मोठे काका जनार्दन बंसवाल हे तुकाराम वाडी परिसरात राहत असून रविवारी रात्री दुकानावरील काम आटोपून विशाल हा काकांकडेच थांबला होता. विशाल व त्याच्या काकांचा मुलगा आकाश मोची व त्यांचा मित्र रोहीत भालेराव हे घरासमोर गप्पा मारीत बसले होते. त्यावेळी रात्री दोन वाजेच्या सुमारास अचानक लाईट गेल्याने त्यांनी एमएसईबीच्या ऑफिसमध्ये फोन लावला. परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने तिघे दुचाकीवरुन एमएसईबीच्या ऑफिसकडे जाण्यासाठी निघाले.
पाठलाग करीत केला हल्ला
दिक्षीतवाडीतील जीमसमोरुन तिघे एमएसईबीच्या ऑफिसकडे जातांना तेथे भूषण अहिरे, पवन उर्फ बद्या बाविस्कर, आकाश उर्फ खंड्या सुखलाल ठाकूर आणि त्यांचे इतर ३ ते ४ साथीदार वाढदिवस साजरा करत उभे होते. विशाल आणि त्याचे मित्र मोटारसायकलवरून जाताना पाहून या टोळक्याने त्यांचा पाठलाग करीत दुचाकीवर मागे बसलेल्या विशाल मोचीला खाली ओढत मारहाण केली. त्यानंतर धारदार चाकूने त्याच्यावर वार करीत त्याचा निर्घण खून केला.
आमच्यावर एमपीडीए लावता का म्हणत केला हल्ला
विशालचा खून करतांना हल्लेखोरांनी ‘आम्ही भूषण भाचाचे साथीदार आहोत. आमच्यावर एमपीडीए लावता का, मारूनच टाकतो’ असे ओरडत होते. त्यांनी विशालच्या मानेवर, छातीवर आणि डोक्यावर चाकूने गंभीर वार केले, त्यामुळे विशाल हा त्यांच्या तावडीतून सुटून तो रस्त्यावर धावत गेला आणि तेथे दुभाजकाजवळ तो कोसळला.
दोघांवर वार करीत केले जखमी
टोळक्याकडून विशालवर वार केले जात असतांना त्याच्यासोबत असलेले दोघांनी तेथून पळ काढला. यावेळी हल्लेखोरांनी त्यांचाही पाठलाग करून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि चाकूने वार केले, त्यानंतर ते तिथून पळून गेले. घटनेची माहिती विशालचा भाऊ आकाशने त्याच्या वडीलांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येवून त्यांनी जखमी विशालला रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत मयत घोषीत केले.
नातेवाईकांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
या घटनेने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली होती. दुपारी पवन उर्फ बद्या दिलीप बावीस्कर, आकाश उर्फ खंड्या सुखलाल ठाकूर आणि भूषण मनोज अहिरे यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोघांना अटक केल्यानंतर नातेवाईकांनी विशालचा मृतदेह ताब्यात घेतला.
दोघ संशयितांच्या जिल्हापेठ पोलिसांनी आवळल्या मुसक्या
घटनेनंतर पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ मिलिद सोनवणे, पोकों राहुल पाटील, समाधान पाटील, नरेंद्र दिवेकर, प्रशांत सैंदाणे, तेजस मराठे, गोविंदा साबळे, विशाल साळुंखे, तुषार पाटील, जयश मोरे यांचे पथक संशयितांच्या शोधार्थ रवाना केले. या पथकाने संशयित आकाश सुकलाल ठाकुर उर्फ खंड्या (रा. तुकारामवाडी), भूषण रमेश अहिरे (रा. पिंप्राळा) या दोघांच्या मुसक्या आवळल्या असून इतर संशयितांचा शोध घेतला जात आहे.
दोघांवर हद्दपारीची कारवाई
घटनेतील संशयित पवन उर्फ बद्या बाविस्कर व आकाश उर्फ खंड्या ठाकूर यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. मात्र हद्दपार असताना मध्यरात्री झालेल्या खूनात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आकाश उर्फ खंड्या ठाकूर याला अटक करण्यात आली आहे.
हत्येला जून्या वादाची किनार
संशयित हल्लेखोर पवन उर्फ बद्या दिलीप बावीस्कर, आकाश उर्फ खंड्या सुखलाल ठाकूर आणि भूषण मनोज अहिरे यांच्यासोबत सन २०१२ मध्ये आकाश व त्याचा मित्र रोहित भालेराव यांच्यासोबत वाद झाला होता. तसेच, जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर याच टोळक्याने केलेल्या हल्ल्यात सुरज ओतारी याचा खून झाला होता. मयत सूरज ओतारी याच्याशी विशाल आणि त्याचे मित्र संबंधित असल्याने, तेव्हापासून संशयितांचा त्यांच्यावर राग होता. याच जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.