जळगाव (प्रतिनिधी) टेलीग्रामवर सोपे टास्क पुर्ण करीत सुरुवातीला तरुणाला नफा दिला. मात्र नंतर चुकीचे टास्कचे कारण देत तरुणाला १२ लाख १९ हजार रुपयात ऑनलाईन गंडविले. तसेच तरुणाला वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास भाग पाडून त्याची फसवणुक केली. ही घटना बुधवारी सायंकाळच्या सुमरास उघडकीस आली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारोळा तालुक्यातील चहुत्रे येथे अक्षय भारत पाटील (वय ३१) हा तरुण वास्तव्यास आहे. तो दि. १६ जून ते दि. २२ त्यांच्या ‘अक्की पी’ या टेलीग्राम आयडीवर अनेक अज्ञात टेलीग्राम खातेधारक आणि एका व्हॉट्सअॅप क्रमांकाच्या धारकाने संपर्क साधला. या सायबर गुन्हेगारांनी अक्षय पाटील यांना सुरुवातीला ‘गुगल कॉईन्स ग्रुप’ आणि त्यानंतर ‘गुगल व्हीआयपी ग्रुप’ या टेलीग्राम ग्रुपमध्ये अॅड केले. या ग्रुपमध्ये त्यांना ऑनलाईन टास्क पूर्ण करून पैसे कमावण्याचे आमिष दाखवण्यात आले. सुरुवातीला काही टास्क पूर्ण केल्यावर अक्षय पाटील यांना थोडा नफाही मिळाला, ज्यामुळे त्यांचा विश्वास वाढला.
फसवणूक झाल्याचे समजताच दिली तक्रार
कोणताही परतावा न देता, अक्षय पाटील यांच्याकडून वेगवेगळ्या युपीआय आयडी आणि बँक खात्यांद्वारे तब्बल १२ लाख १९ हजार १८३ रुपये स्वीकारले. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, अक्षय पाटील यांनी तात्काळ जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन कायदेशीर फिर्याद दिली आहे. याप्रकरणी, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे पुढील तपास करत आहेत. नागरिकांनी अशा प्रकारच्या ऑनलाईन आमिषांपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
रिकव्हरीच्या नावाखाली उकळले पैसे
विश्वास संपादन झाल्यानंतर, सायबर गुन्हेगारांनी आपला डाव साधण्यास सुरुवात कैली. त्यांनी अक्षय पाटील यांना टास्क चुकीच्या पद्धतीने पूर्ण केल्याचे सांगून ‘रिकव्हरी’च्या नावाखाली वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे मागण्यास सुरुवात केली.