चाळीसगाव (प्रतिनिधी) अभंगाच्या मूळ रचनांना धक्का न लावता त्याला आधुनिक संगीताचा साज देवून नव्याने अभंग सादर करण्याचा नवीनच प्रयोग ‘अभंग रिपोस्ट’ च्या तरुणांनी एकदंत महोत्सवामध्ये सादर केला. अभंग रिपोस्टच्या बँडने तरुणाई थिरकली.
आजच्या तरुणांना जे संगीत माध्यम आवडतं त्या माध्यमातून संतांचे अभंग त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम अभंग रिपोस्टच्या माध्यमातून होत आहे. चाळीसगावची जनता हि वारकरी जनता आहे. या वारकरी जनतेला नव्या पद्धतीने मांडलेले अभंग नक्कीच आवडतील असा विश्वास आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी मनोगतातून व्यक्त केला.
दरवर्षी मोठ्या उत्साहात एकदंत महोत्सव आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या माध्यमातून साजरा साजरा होत असतो. 5 वर्षांपूर्वी एकदंत महोत्सवाची संकल्पना मांडण्यात आली. आणि आज या उत्सवाला व्यापक व मोठे स्वरूप प्राप्त झालेले पाहायला मिळत आहे. दरवर्षी नवीन थीमवर एकदंत महोत्सव साजरा होत असतो. यावर्षी राम मंदिराची प्रतिकृती साकार करून प्रभू श्री रामांना वंदन करणारी थीम साकारली आहे. या मंदिराची प्रतिकृती पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती.
सोशल मिडीयावर धुमाकूळ घालणार बँड म्हणजे अभंग रिपोस्ट. दुष्यंत देवरुखकर, स्वप्निल तर्फे, अजय वाव्हळ, प्रतिष म्हस्के, पियुष आचार्य आणि विराज आचार्य या 6 तरुणांनी ही संकल्पना मांडली. विविध स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या या बँडने नंतर व्हिडीओज बनवून युट्यूबवर टाकले. त्यालाही हजारोंनी लाइक्स मिळाले आहेत.अभंग, भजन, बालगीतं, शिवतांडव स्तोत्र यांना पाश्चात्य संगीताचा साज चढवत त्यांनी हे सादर करायला सुरूवात केली. ‘मलबार हिल महोत्सवा’ पासून सुरु झालेला हा प्रवास्र चाळीसगावच्या एकदंत महोत्सवापर्यंत येवून पोहोचलेला आहे.
बेस गिटार, अॅकॉस्टिक गिटार तबला, ड्रम्स, पियानो यासारख्या वाद्यांचा त्यामध्ये वापर होतो.
आपल्या मातीत जन्मलेल्या संत मंडळींनी केलेल्या उपदेशांचा खरा अर्थ ‘अभंग रीपोस्ट’मुळे नव्या तरुणाईला उमगत आहे.
संतांचा उपदेश आजच्या तरुणाईपर्यंत त्यांना आवडेल, रूचेल, पटेल अशा मार्गानं पोहोचवणं हा आमचा यामागचा हेतू आहे.
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ ‘सुंदर ते ध्यान’ ’ दादला’देह देवाचे मंदिर, ऐसे कैसे झाले भोंदू यासारखे अभंग तसंच भारुड त्यांनी नव्या रुपात सादर केलीत.