चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव शहर आणि परिसरात गुन्हे शाखेसह पोलिसांनी केलेल्या कारवाईत् दोन पिस्टलसह संशयीताना अटक करण्यात आली. दोघांविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. शिवम कैलास जगताप आणि अभिजीत चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
ग्रामीण पोलिसात गुन्हा
पहिल्या कारवाईत चाळीसगाव शहरात पेट्रोलिंग दरम्यान पोलिस नाईक राहुल पाटील यांना समजलेल्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली. या कारवाईत चाळीसगाव भडगाव रोडवरील वडाळा वडाळी फाटयानजीक माऊली हॉटेल जवळ शिवम कैलास जगताप याला गावठी बनावटीच्या पिस्टल व चार जिवंत काडतुसासह अटक करण्यात आली. त्याच्याकडून एकुण 34 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन काडतूस व कट्टा जप्त
दुसर्या कारवाईत हवालदार सुधाकर अंभोरे यांना समजलेल्या माहितीच्या आधारे चाळीसगाव भडगाव रोडवरील अंबिका हॉटेल जवळ अभिजीत रतन चव्हाण याच्या कब्जातून गावठी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहेत. त्याच्या ताब्यातून 32 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेतील अभीजीत चव्हाण याने त्याच्याकडील पिस्टल पाचोरा येथील समाधान बळीराम निकम याच्याकडून विकत घेतल्याची कबुली देताच समाधान निकम याला देखील ताब्यात घेण्यात आले.
दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण करत आहेत. दोघा आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सुधाकर अंभोरे, लक्ष्मण पाटील, मुरलीधर धनगर, राहुल पाटील आदींनी केली.