जळगाव (प्रतिनिधी) आमदार राजूमामा भोळे हे अगदी निःशुल्क दर म्हणजे प्रतिदिन २०० रुपये मात्र भरून शासकीय विश्राम गृहाचा उपभोग घेत असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे अभिषेक पाटील यांनी केला आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियात एक पोस्ट व्हायरल केली आहे. एवढेच नव्हे तर, घरी राहून वीज बिल तसेच मनपा कर भरून स्वतःचं आर्थिक नुकसान करून घेण्यापेक्षा जळगावकरांनी देखील अशाच पद्धतीने शासकीय विश्राम गृहाचा वापर करावा, असा मिश्कील टोला देखील लगावला आहे.
राष्ट्रवादीचे अभिषेक पाटील यांनी आज सोशल मीडियात एक पोस्ट टाकली होती.
पोस्ट जशीच्या तशी
जळगाव शहरातील एका प्रमुख पक्षाचा प्रमूख पदाधिकारी विश्रामगृहाचा अगदी निःशुल्क दर म्हणजे प्रतिदिन 200 रु मात्र भरून शासकीय विश्राम गृहाचा उपभोग घेत आहेत .आपण उगाच आपल्या घरी राहून वीज बिल तसेच मनपा कर भरून स्वतःचं आर्थिक नुकसान करून घेऊ नये .त्या मुळे जळगाव शहरातील प्रत्येक सर्वसाधारण नागरिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्या वा ही विनंती….!
लाभ घ्यायचे ठिकाण – अजंठा शासकीय विश्राम गृह , जळगाव
दर – 200 रु प्रति दिन (24 तास Ac फ्री , मुबलक पाण्याची व्यवस्था ,शासकीय नोकर , 100 %स्वच्छ असलेला परिसर तसेच प्रदूषण विरहित हवा) चला तर मग जळगावकर वाट कसली बघतात सर्वांनी मिळून या सुवर्ण संधी चा लाभ घेऊ या …..!
या पोस्टवर काही जणांनी अभिषेक पाटील यांच्याकडे पुरावा मागितला होता. त्यावर अभिषेक पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम अभियंत्यांना सुरेश दामू भोळे या नावाने ६ हजार रुपयाचा दिलेला चेकचा फोटो ग्रुपवर टाकला. दरम्यान, या मुद्यावरून सोशल मीडियात जोरदार हास्याचे फवारे उडताय. यावर आमदार राजूमामा भोळे काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.