मुंबई (वृत्तसंस्था) ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी बाजी मारली आहे. राज्यातील ठाकरे सरकारच्या बाजूने हा कौल नाही तर काय आहे? ‘ग्रामपंचायती हा लोकमताचा कौलच असतो, तो मान्य करा नाहीतर महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही’ तसेच भाजपची सूज लोकांनी उतरवली आहे असा टोला शिवसेनेने लगावला आहे.
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. यामध्ये काही ठिकाणी बुरुज पडले आहेत तर काही जण आपले गड राखण्यात यशस्वी झाले आहेत. निवडणूक निकालानंतर सर्वाधिक जागा जिंकल्या असल्याचा दावा भाजपने केला आहे. यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारवर लोक नाराज असल्याचे भाजप म्हणत आहे. या सर्वांचाच शिवसेने सामनामधून समाचार घेतला आहे. ग्रामपंचायती हा लोकमताचा कौलच असतो, तो मान्य करा नाहीतर महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आजच्या सामनातून राऊतांनी जोरदार बॅटिंग करत तुफान फटकेबाजी केलीय. महाविकास आघाडी सरकारला जनमताचा अजिबात पाठिंबा नाही. ‘ठाकरे सरकार’ म्हणजे जुगाड आहे, ते जोडतोडीतून बनले आहे अशी तोंडची हवा महाराष्ट्रातील विरोधी पक्ष गेले वर्षभर सोडत आहे. त्या विरोधी पक्षाची हवा ग्रामपंचायत निवडणुकीत निघाली आहे. राज्यभरातील साडेतीन हजारांवर ग्रामपंचायतींचे निकाल हाती येत आहेत. त्यात महाविकास आघाडीने चांगलीच मुसंडी मारली आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी जिंकलेल्या ग्रामपंचायती पाहता भाजपची सूज लोकांनी उतरवली आहे हे स्पष्ट दिसत आहे, असं राऊत म्हणाले.
“भाजपचे ग्रामपंचायतींचे निकाल हा राज्याच्या जनतेचा कौल आहे. ग्रामपंचायती म्हणजे गाव खेड्यातल्या, पाड्यावरच्या विधानसभाच आहेत. त्या निवडणुकीत राज्याची जनता मतदान करते. आजपर्यंतचे निकाल पाहता भारतीय जनता पक्षाचे सर्व गडकिल्ले लोकांनी उद्ध्वस्त केले आहेत. विखे पाटील यांच्या ताब्यात २० वर्षांपासून असलेली लोणी खुर्द ग्रामपंचायत त्यांनी गमावली आहे. रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, राम शिंदे, नीतेश राणे यांच्या घरातील ग्रामपंचायती भाजपने गमावल्या आहेत.” “रोहित पवार यांनी चौंडी गावची ग्रामपंचायत जिंकून आणली आहे. शिंदे हे अहिल्याबाई होळकरांचे वंशज व चौंडी हे अहिल्याबाईंचे जन्मस्थान. त्यामुळे जनतेने भाजप पुढाऱ्यांची सत्ता कशी उलथवून टाकली ते समजून येते. रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन तालुक्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. सर्वच पक्षांतील वजनदार लोकांना, प्रस्थापितांना या निवडणुकीत धक्के बसले आहेत, पण जगातील नंबर एकचा तोरा मिरविणाऱ्यांना महाराष्ट्रीय जनतेने माती चारली आहे.”
“पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील पराभवातूनही त्यांनी धडा घेतला नाही. आता ग्रामपंचायत निवडणुकीने तर भ्रमाचा फुगाच फोडला आहे. महाराष्ट्राच्या जनतेची पावले योग्य दिशेनेच पडत आहेत. भुलभुलैयांच्या धुक्यातून ती बाहेर पडली आहे. पंतप्रधान मोदी हे देशभर पहिल्या क्रमांकाचे लोकप्रिय नेते आहेत, पण महाराष्ट्रावर उद्धव ठाकरे यांचेच गारुड आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष त्यांच्या गावातील ग्रामपंचायत जिंकू शकले नाहीत. रावसाहेब दानवेंनी भोकरदन गमावले आहे. नागपूर ग्रामीणला अनिल देशमुखांनी बाजी मारली आहे. फक्त आम्हीच, दुसरा कोणी नाही असा तोरा मिरविणाऱ्यांचा हा पराभव आहे.” भाजपचे प्रदेशाध्यक्ष त्यांच्या गावातील ग्रामपंचायत जिंकू शकले नाहीत. रावसाहेब दानवेंनी भोकरदन गमावले आहे. नागपूर ग्रामीणला अनिल देशमुखांनी बाजी मारली आहे. फक्त आम्हीच, दुसरा कोणी नाही असा तोरा मिरविणाऱ्यांचा हा पराभव आहे. ठाकरे सरकार लोकांचे प्रश्न मार्गी लावत आहे. राज्याने विकासाची गती पकडली आहे. विरोधी पक्षाने आता स्वतःला सावरायला हवे. ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी बाजी मारली आहे.
राज्यातील ठाकरे सरकारच्या बाजूने हा कौल नाही तर काय आहे? महाविकास आघाडी सरकारला जनतेचा ‘कौल’ नाही असे म्हणणाऱ्यांच्याच घरावरची ‘कौले’ जनतेने काढून टाकली आहेत. ग्रामपंचायती हा लोकमताचा कौलच असतो, तो मान्य करा नाहीतर महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही. ईडी, सीबीआय, आयकरातील ‘कार्यकर्त्यां’ना हाताशी धरून महाराष्ट्रात राजकीय क्रांती घडविता येणार नाही. महाराष्ट्राची मातीच वेगळी आहे. चला, हवा येऊ द्या!