धुळे (प्रतिनिधी) गट विमा योजनेचे मंजुर १ लाख ३३ हजार ४८४ रुपयांचे देयक मिळवून देण्यासाठी सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षकाकडून तडजोडीअंती ४ हजार रुपयांची लाच स्वीकारतांना अक्कलकोस (ता. शिंदखेडा) येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना बापुराव जगताप यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्कलकोस (ता. शिंदखेडा) येथील शासकिय माध्यमिक आश्रमशाळेतून निवृत्त झालेले तक्रारदार माध्यमिक शिक्षकांचे गट विमा योजनेचे १ लाख ३३ हजार ४८४ रुपये देयक आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे प्रकल्प अधिकारी यांनी मंजूर केले होते. या देयकाचे आहरण व संवितरण करण्याचे काम अक्कलकोस येथील शासकिय माध्यमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना बापूराव जगताप (३९) रा. अभिनव रो हाऊस, मखमलाबाद रोड नाशिक, यांच्याकडे होते. त्यामुळे तक्रारदार यांनी अर्चना जगताप यांच्याकडे थकीत देयकासाठी पाठपुरावा केला असता, त्यांनी तक्रारदार यांच्याकडे देयक मिळवून देण्यासाठी ५ हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ४ हजार रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले.
याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे कार्यालयात दुरध्वनीवर माहिती दिली होती. त्यानुसार, एसीबीच्या पथकाने दोंडाईचा येथे जावून तक्रारदार यांची तक्रार नोंदवून घेतली. याबाबत दि.१ जानेवारी रोजी पडताळणी केली असता मुख्याध्यापिका अर्चना जगताप यांनी तक्रारदार यांच्याकडे ४ हजार रुपये लाचेची मागणी करुन लाचेची रक्कम स्वतः स्विकारल्याने त्यांना पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापिका अर्चना जगताप यांच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली आहे.
















