धरणगाव (प्रतिनिधी) लोकांच्या स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या एका तरुण अभियंत्यावर काळाने झडप घातली आहे. धरणगाव पंचायत समिती गृहनिर्माण म्हणून कार्यरत असलेले शुभम संजय सोनवणे (वय,२५ रा. अमळनेर) यांचा शुक्रवारी सायंकाळी म्हसले गावाजवळ अपघाती मृत्यू झाला आहे.
दुसऱ्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करताना स्वतःच्या घराचेही स्वप्न रंगविणारा शुभम सोनवणे हा तरुण धरणगाव पंचायत समितीत ग्रामीण गृहनिर्माण अभियंता म्हणून २०१९ पासून काम करत होता. मानधन तत्वावर कार्यरत असल्यामुळे शासकीय सवलती नव्हत्या. शुभम नेहमी प्रमाणे कार्यालयीन काम आपटून शुक्रवारी (दि.५ ऑगस्ट) अमळनेर आपल्या घरी जात होता. परंतू रात्री साधारण ८ वाजेच्या सुमारास म्हसले ते टाकरखेडा दरम्यान पाऊस सुरू झाला. या पावसामुळे शुभमची दुचाकी स्लीप झाली. त्यात शुभमच्या डोक्याला जबर मार लागला. त्यात त्याचे जागीच निधन झाले. लोकांच्या घराचे स्वप्न पूर्ण करणारा शुभम अखेरच्या प्रवासात स्वतःच्या घरी पोहचू शकला नाही. शुभमच्या पश्चात आई – वडील, भाऊ – बहिण असा परिवार आहे. घरातली सर्व जबाबदारी शुभमवरच होती. परिवाराची परिस्थिती बिकट असल्याने शासनाकडून काही आर्थिक मदत मिळाली तर बरं होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
स्वप्नांचा ‘अपघात’ !
वडिलांनी मोठ्या कष्टाने शुभमला उच्च शिक्षित केले होते. कठीण परिस्थिती असूनही शुभमने शिक्षणाची जिद्द सोडली नव्हती. नुकतेच त्याने बी.टेक. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यामुळे शुभम नेहमी मित्र दिनेश भदाणे (धरणगाव) यांच्यासह कार्यालयीन सहकाऱ्यांना त्याच्यावर असलेल्या पारिवारिक जबाबदारी बाबत बोलायचा. लहान-भाऊ बहिणीचे शिक्षण करायचे आहे. स्वतःचे घर बनवायचे आहे. माझे स्वप्न पूर्ण होईल, तेव्हा होईल. परंतू लोकांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यात माझा हातभार लागतोय, यातच मला मोठा आनंद असल्याची भावना शुभम नेहमी व्यक्त करायचा. खऱ्या अर्थाने हा शुभमचा नव्हे तर नियतीने स्वप्नांचा केलेला अपघात असल्याचे म्हटले चुकीचे ठरणार नाही. कारण शुभमचे वडील ज्या अमळनेर-धरणगाव मार्गावर कालीपिली चालवतात त्याच रस्त्यावर त्यांच्या उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न कायमचे पुसले गेले आहे.