चंद्रपूर (वृत्तसंस्था) चंद्रपूरवरून गडचिरोलीला भाऊबीजकरिता दुचाकीने जात असताना मार्गावरील खड्डा चुकविण्याचा नादात पतीचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दोघेही खाली पडले. याचदरम्यान समोरून येणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या मागील चाकात पत्नी आल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारी २.३० वाजता दरम्यान मूल चंद्रपूर मार्गावरील आगडीजवळ घडली. सुरेखा जितेंद्र गोन्नाडे (वय ३७, वर्षे रा. बंगाली कॅम्प इडस्ट्रील एरिया, चंद्रपूर) असे मृत महिलेचे नाव आहे.
पती जितेंद्र पुंडलिक गोन्नाडे (३८), पत्नी सुरेखा जितेंद्र गोन्नाडे, मुलगी आकांशा जितेंद्र गोन्नाडे (१३), मुलगा रयन जितेंद्र गोन्नाडे (८) यांच्यासह दुचाकीने (क्रमांक एम.एच ३४ बी. डब्ल्यू ३७८४) चंद्रपूर वरून गडचिरोलीला भाऊबीजेकरिता जात होते. मात्र, रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या नादात पतीचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी घेऊन सर्वजण खाली पडले.
विरुद्ध दिशेने मूलवरून चंद्रपूरकडे येणारी खाजगी प्रवासी वाहतूक करणारी ट्रॅव्हल्स (एम. एच- १५ ए.के-१६९८) ट्रॅव्हलच्या मागील चाकात पत्नी आल्याने तिच्या डोक्याचा पूर्ण चेंदामेंदा होऊन घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला. तर पती किरकोळ जखमी झाला. मात्र सुदैवाने दोन्ही मुले बालबाल बचावली. घटनेची माहिती मिळताच मूल पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शविच्छेदनासाठी मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.