यवतमाळ (वृत्तसंस्था) बहिणीच्या निधनाचे वृत्त ऐकून शोकाकुल झालेला भाऊ तिच्या अंत्यविधीसाठी आला; परंतु बहिणीच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यापूर्वीच राज्यमार्गावर झालेल्या भीषण अपघातात भाऊचाही मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. पत्रकार भीमराव पुनवटकर असे मृताचे नाव आहे.
अंबोडा येथील सयाबाई मुनेश्वर यांचे काल निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज दुपारी करण्याचे ठरले होते. नातवाईकांना निरोप असताना विरुद्ध दिशेने भरधाव वेगात आलेल्या एमएच २६ बीसी ०९४८ क्रमांकाच्या बोलेरो वाहनाने भीमराव पुनवटकर यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ते कित्येक फूट दूरवर फेकल्या गेले. अपघातानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव बोलेरोही पलटी झाली. या बोलेरो गाडीतून तामसा येथील शेटे कुटुंबातील भाविक माहूर गडावर देवदर्शनाला जात असल्याचे कळते. बोलेरोच्या अपघातात किमान ५ जण जखमी झाले.
या अपघातानंतर सयाबाईची तिरडी जागीच ठेऊन अंत्ययात्रेतील लोक पुलाकडे धावले. या अपघातात सयाबाई मुनेश्वर यांचे सख्खे भाऊ भीमराव पुनवटकर गंभीर जखमी झाल्याचे कळताच नातेवाईकांनी हंबरडा फोडला. नेमके यावेळी महागाव तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष गणेश भोयर कुटुंबीयांसह यवतमाळला जात होते. त्यांनी लगेच घटनास्थळी जखमींना मदतीचा हात दिला. रुग्णवाहिका पाचारण करून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठविल्यानंतर सयाबाईच्या पार्थिवावर साश्रुनयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर यवतमाळ येथे शासकीय रुग्णालयात भीमराव पुनवटकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बहिणीच्या निधनानंतर भावाचा झालेला अपघाती मृत्यू काळजाला चटका लावून गेला असून या हृदयद्रावक घटनेने समाजमन हळहळले आहे.