चंद्रपूर (वृत्तसंस्था) आईस्क्रीम घेऊन देतो, असे सांगून मुलासोबत स्कुटीने बुधवारी सायंकाळी घरातून बाहेर निघालेल्या मातेचा वर्धा नदी पुलावरून नदीपात्राच्या कडेला कोसळून मृत्यू झाला, तर वर्षाच्या बालकाचा जीव वाचला. हा निरागस बालक रात्रभर आईच्या मृतदेहाला बिलगून रडत बसला होता. हे दृश्य बघून अनेकांना अश्रू अनावर झाले. सुषमा पवन काकडे (३९), असे मृत महिलेचे नाव आहे.
बुधवारी सायंकाळी चार वर्षीय मुलाने आईस्क्रीम घेऊन देण्याचा आग्रह आई-वडिलांकडे धरला होता. त्यामुळे सुषमा काकडे ही महिला बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास आपल्या चार वर्षांच्या मुलासोबत घेत आईसक्रीम घेण्यासाठी दुचाकीने बामणीहून राजुराकडे जात होती. त्यातच दुचाकीचा तोल गेल्याने दुचाकीसह ती महिला पुलावरून नदीपात्राच्या कडेला पडल्याने तिचा मृत्यू झाला. तर चार वर्षाच्या बालकाचा जीव वाचला. परंतू निरागस बालक रात्रभर आईच्या मृतदेहाला बिलगून रडत बसला होता.
बुधवारी रात्री पवन आणि त्याच्या इतर नातेवाईकांनी काही काळ सुषमाचा शोध घेतला आणि नंतर बल्लारपूर पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. मोबाइल लोकेशन राजुराच्या दिशेने दिसल्यामुळे कुटुंबीय व पोलीस मागावर होते. तिचं लास्ट लोकेशन बामणी राजूरा मार्गावरील वर्धा नदीच्या जवळ दाखवत होतं. ही माहिती मिळताच पहाटे ५ वाजताच पवन यांनी पोलिसांसह नदी किनारी धाव घेऊन शोध मोहीम हाती घेतली. पुलाजवळ येताच त्यांना मुलाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी जवळ जाऊन पाहिल्यावर सुषमाचा मृतदेह पडलेला दिसला. तसेच लहान मुलगा बाजूला चिखलात पडून रडत असल्याचंही दिसलं. अंधार असल्याने रात्रभर कुणाचीही या दोघांवर नजर पडली नाही.
बालकावर सध्या उपचार सुरू आहेत. पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी महिलेला ग्रामीण रुग्णालयात नेले, तिथे डॉक्टरांनी सुषमा काकड़े यांना मृत घोषित केले, महिलेचा पती पवन काकडे हे पंजाब नॅशनल बँकेत कर्मचारी आहे. सुषमा देवीच्या दर्शनासाठी बामणीत आल्याची माहिती समोर आली आहे. असे काय घडले की बामणीहून ती घरी न जाता राजुराच्या दिशेला गेली. चर्चा नदी पुलावर हा अपघात कसा झाला? आदी प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. दरम्यान, पुढील तपास बल्लारपूर पोलीस करत आहेत.