जळगाव(प्रतिनिधी) ई – पीक पाहणीचे 76.42 टक्के काम पूर्ण झाले असून नाशिक विभागात जिल्हा अव्वल आहे. 20 आणि 21 सप्टेंबर रोजी यासाठी विशेष मोहिम म्हणून हे काम हाती घेतले त्यामुळे हा आकडा उद्दिष्टाच्या जवळ जाऊ शकतो. ई- चावडी मध्ये जिल्ह्यातील 22 गावचे कामं शिल्लक असून येत्या काही दिवसात ते पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
ई – पीक पाहणीत रावेर, अमळनेर आणि भुसावळ तालुक्यानी उत्तम काम केले आहे. जळगाव, चाळीसगाव आणि बोधवड तालुक्यांना अधिक गतीने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात 194 नवीन तलाठी आणि 720 मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांना 20 आणि 21 सप्टेंबर रोजी ई – पीक पाहणीची विशेष मोहिम मध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे. सेवा हक्क कायद्या प्रमाणे जिल्ह्यातील 99.33 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यात फक्त 211 अर्जाचा निपटारा वेळेत करता आला नाही.
केंद्राच्या कृषी मंत्रालयाने खरीप हंगाम २०२३ पासून डिजिटल क्रॉप सर्व्हेचा (डीसीएस) पथदर्शी प्रकल्प राबविला जात असून चालु वर्षासाठी जिल्ह्यात यासाठी भुसावळ तालुक्याची निवड केली असून 86.43 टक्के काम पूर्ण झाले आहे. अवैध गौण खनिज व वाहतूक यावरच्या दंडात्मक कारवाईत 2023-24 मध्ये 841 वाहने जप्त केली होती. त्यातील 320 वाहने दंडाची रक्कम भरली नसल्यामुळे प्रशासनाच्या कस्टडीत आहेत. तर चालु वर्षात 265 वाहने जप्त केली असून त्यातील 102 वाहने दंडाची रक्कम भरली नाही म्हणून कस्टडीत आहेत. 422 जप्त वाहने लिलावात काढली असून त्याची कार्यवाही आर. टी. ओ. कार्यालयाकडून सुरु आहे.
जिल्ह्यात एकूण 25 खाणी त्यातल्या दोन बंद करण्यात आल्या आहेत. सध्या सुरु असलेल्या 23 खाणी पैकी 9 शासकीय जागेत आहेत. सर्व खाणी चालकांची पुढच्या आठवड्यात बैठक घेण्यात येणार असून तसे पत्र देण्यात पाठवण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
पोट खराबी क्षेत्र वहिताखाली आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न असून जिल्ह्यात 46 हजार 210 हेक्टर एवढे क्षेत्र पोट खराबीचे असून त्यातील 5,810.17 हेक्टर एवढेच क्षेत्र वहीताखाली आणता आले आहे.अजूनही 40 हजार 370 हेक्टर क्षेत्र पोट खराबीचे आहे. नदी, नाला आणि शासनाच्या जमिनीचाही यात अंतर्भाव असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.