नागपुर (वृत्तसंस्था) नागपूरमध्ये गुन्हेगारीच्या घटनांचे सत्र सुरू आहे. शहरातील तहसील पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाच कुटुंबातील ५ जणांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या केल्यानंतर कुटुंबप्रमुखाने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे नागपुरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमधील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा आलोक माथुरकर याने आपली पत्नी, मुलगा, मुलगी यांची हत्या केली. नंतर तिथेच थोड्या अंतरावर राहणाऱ्या सासरी जाऊन सासू आणि मेहुणीची हत्या केली. हत्या केल्यानंतर तो पुन्हा आपल्या घऱी आला आणि गळफास घेत आत्महत्या करुन जीवन संपवलं.
रविवारी रात्री या हा सगळा प्रकार घडल्याचं समजत आहे. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केला असून सर्व मृतदेह ताब्यात घेतले आहेत. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
अलोक हे टेलरिंगचे काम करायचे. प्रमोद भिसिकर यांच्या घरी भाड्याने राहायचे. कौटुंबिक कलहातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. अलोकने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.