मुंबई (वृत्तसंस्था) अहमदनगरमधील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याप्रकरणी फरार आरोपी ज्येष्ठ पत्रकार बाळ बोठे याला हैद्राबाद येथून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आधीच ५ जणांना अटक झालेली आहे.
रेखा जरे यांची ३० नोव्हेंबर रोजी अहमदनगर-पुणे महामार्गावर जातेगाव फाटा घाटात गळ्यावर वार करून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून आत्तापर्यंत ५ आरोपींना अटक केली होती. यातील आरोपी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बोठे हे फरार होते. त्यांचा तपास तब्बल तीन महिन्यांनी पोलिसांना लागला असून त्यांना हैदराबाद येथून अटक करण्यात आली आहे. रेखा जरे या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यकर्त्या होत्या. २०१४ च्या निवडणुकीनंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. चार वर्षांपूर्वी रेखा जरे यांनी महिला सक्षमीकरणासाठी यशस्विनी महिला ब्रिगेड ही संघटना स्थापन केली.
काय आहे प्रकरण?
३० नोव्हेबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास पारनेर तालुक्यातील जतेगाव घाटात रेखा जरे यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी हल्ला केला होता. मोटरसायकल (क्रमांक एम एच 17-2380) वरून आलेल्या दोन अज्ञात २५ ते ३० वयोगटातील तरुणांनी गाडीला धक्का लागल्याचे कारणावरून रेखा जरे यांच्याशी वाद घातला होता. काही वेळाने या तरुणांनी धारदार शस्त्रानं रेखा जरे यांच्या गळ्यावर वार केले होते. गंभीर जखमी अवस्थेत रेखा जरे यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले होते. मात्र, त्या आधीच त्यांचा मृत्यू झाला होता.
याप्रकरणी जरे यांच्या आईने आरोपीविरोधात फिर्याद दिली होती. त्यानंतर अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जरे यांच्या मुलाने त्या आरोपींपैकी एकाचा फोटो काढला होता. त्यानुसार पोलिसांनी प्रथम दोन आरोपींना अटक केली आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आणखी तिघांना अटक केली गेली. ज्ञानेश्वर उर्फ गुडु शिवाजी शिंदे (श्रीरामपूर), फिरोज राजू शेख (राहूरी), आदित्य सुधाकर चोळके (कोल्हार बुद्रुक), सागर भिंगारदिवे आणि ऋषिकेश पवार (अहमदनगर) या पाच जणांना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीनंतर असे समोर आले की एका वृत्तपत्राचा कार्यकारी संपादक असलेला बोठे याने जरे यांच्या हत्येची सुपारी दिली होती.
जरे याने अटकपूर्व जामीन मिळवण्याचा देखील प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्याला फरार घोषित केले होते. पारनेरमधील न्यायालयाने त्याला फरार घोषित करून ९ एप्रिलपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. दरम्यान त्याला कुणीकुणी आश्रय दिला, कुणी त्याला मदत केली याचा शोध घेतला जात आहे. हैदराबाद येथून जरेला अटक करताना पोलिसांनी त्याला मदत करणाऱ्या तिघांना देखील अटक केली आहे. मदत करणाऱ्या आणखी तिघांची नावं पोलिसांना मिळाली आहेत. यात एका महिलाचाही समावेश आहे.