जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वेगाने वाढत आहे. यातच जिल्ह्यात अत्यावस्थ असलेल्या रुग्णांना रेमडीसीवर दिले जात आहे. मात्र काही औषधविक्रेते हे इंजेक्शन जादा दराने त्याची विक्री करीत असल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुनिल भंगाळे यांनी दिली.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाकडून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यातच जिल्ह्यात बाधितांवर उपचार करण्यासाठी बेडच मिळत नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. अत्यावस्थ झालेल्या रुग्णाला वैद्यकीय अधिकार्यांकडून रेमडीसीवर इंजेक्शन दिले जात आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणाहून या इंजेक्शनला मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. काही दिवसांपूवी जळगाव जिल्हा मेडीसीन डिलर्स असोसिएशनकडून सामाजिक बांधिलकी जोपासत हे इंजेक्शन १ हजार २०० रुपयांना विक्री करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु जिल्ह्यातील काही औषध विक्रेत्यांकडून जादा पैसे घेवून हे इंजेक्शन जादा दराने विक्री करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
जादा दराने विक्री करणार्यांची मागविली यादी
आपत्तीच्या काळात औषध विक्रेत्यांनी रेमडीसीवर जादा दराने विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी अन्न औषध प्रशासन व जिल्हाधिकारी यांच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी संघटनेसोबत बैठक घेत जादा दराने विक्री करणार्यांची नावे असोसिएशनकडे मागिवली आहे. जे औषध विक्रेते जादा दराने त्याची विक्री करीत असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
अन्न औषध अधिकार्यांकडे करता येणार तक्रार
जिल्ह्यात जे औषध विक्रेते इंजेक्शनची १ हजार २०० रुपयांपेक्षा जादा दराने विक्री करीत आहे. त्यांची तक्रार करण्यासाठी जिल्हा अन्न औषध प्रशासन अधिकारी डॉ. अनिल माणिकराव ८२०५६०४०८६ यांच्याकडे तक्रार दाखल करु शकणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष सुनिल भंगाळे, सचिव अनिल झंवर, सहसचिव श्रीकांत पाटील, भुसावळ तालुका सहसचिव ईश्वर चौधरी आदी उपस्थित होते.