पुणे (वृत्तसंस्था) अमेरिकेसह युरोपमधील काही देशांनी कच्च्या मालाचा पुरवठा थांबवल्याने कोरोनावरील लसीचे उत्पादन करणाऱ्या भारतातील सिरम इन्स्टिट्युटसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याकडे एक विनंती केली आहे. अमेरिकेमधून निर्यात होणाऱ्या कच्च्या मलावर लादलेले निर्बंध हटवण्याची विनंती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना केली आहे.
शुक्रवारी अदार पूनावाला यांनी ट्वीट केले की, “ आदरणीय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, जर आपण खरोखरच विषाणूचा पराभव करण्यासाठी एकजूट असाल तर मी तुम्हाला विनंती करतो की अमेरिकेबाहेरील लस उद्योगांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवरील निर्बंध हटवा. जेणेकरुन लसीचे उत्पादन वाढवता येईल. आपल्या प्रशासनाकडे सविस्तर माहिती आहे.” अद्याप यावर अमेरिकेकडून कोणतेही उत्तर आलेलं नाही.
कोरोना लसीच्या कच्च्या मालावर बंदी घालणं म्हणजे लसीवर निर्बंध लादण्यासारखे असल्याचं पूनावालांनी म्हटलं होतं. सिरम इन्स्टिट्युटमध्ये नोवाव्हॅक्स या कोरोनावरील लसीचंही उत्पादन होत आहे. मात्र कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे हे उत्पादन बंद पडलंय.
नवीन लसीला मान्यता
देशभरात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. दोन दिवसांत देशात कोरोनाच्या नवीन रुग्णांनी 2 लाखांचा टप्पा पार केला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, अनेक राज्यांनी शनिवार व रविवारच्या कर्फ्यूसह अनेक उपाययोजना केल्या आहेत. दुसरीकडे अधिकाधिक लोकांना लवकरात लवकर कोरोना लस देण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. यामुळे, स्पुटनिक लसीला आपात्कालीन वापरास सरकारने मान्यताही दिली आहे. येत्या काही दिवसांत आणखी काही लसींना परवानगी दिली जाऊ शकते.